लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय नाही, वयस्करांचे हाल, आयुक्त पाहणीसाठी आले आणि…….

| Updated on: Mar 15, 2021 | 8:34 PM

राज्यात कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत महापालिका आयुक्तांनी आज बेलापूर विभागाचा पाहणी दौरा केला (New Mumbai Municipal Commissioner Abhijit Bangar).

लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय नाही, वयस्करांचे हाल, आयुक्त पाहणीसाठी आले आणि.......
Follow us on

नवी मुंबई : राज्यात कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतही कोरोनाचं लसीकरण सुरु आहे. दरम्यान, कोव्हिडची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होतेय का, याबाबत दक्षता घेतली जात आहे का? या बाबींकडे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (New Mumbai Municipal Commissioner Abhijit Bangar) यांचे विशेष लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज (15 मार्च) बेलापूर विभागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांना सेक्टर 1 सीबीडी बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या लसीकरण केंद्रावर काही गोष्टी निदर्शनास आल्या.

आयुक्तांचे आसनाची व्यवस्था करण्याचे निर्देश

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी पुरेसी आसन व्यवस्था नसल्याचं आयुक्तांच्या (New Mumbai Municipal Commissioner Abhijit Bangar) निदर्शनास आलं. आयुक्तांना लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये काही वयस्कर माणसं रांगेत उभे असलेले दिसले. आयुक्तांनी त्यांच्यासोबत बातचित केली. त्यानंतर त्यांनी तातडीने लसीकरणासाठी आलेल्यांसाठी आसनाची व्यवस्था करण्याते आदेश दिले.

नवी मुंबईत आतापर्यंत 47387 जणांना लस टोचली

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 16 फेब्रुवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. 14 मार्चपर्यंत 47387 व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील डॉक्टर्स आणि इतर आरोग्यकर्मी तसेच दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सुरक्षा कर्मचारी असे पहिल्या फळीतील कोरोनायोद्ध्यांना लस दिली गेली. तसेच 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षापेक्षा अधिक वयाच्या सहव्याधी (कोमॉर्बिड) व्यक्ती यांच्या लसीकरणास सुरूवात झालेली आहे.

मास्क वापराच, आयुक्तांचं आवाहन

आयुक्तांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. लसीकरण करण्यास सुरूवात झाल्यानंतर लगेच ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. याचे महत्व लक्षात घेऊन मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री जोपर्यंत सर्व नागरिकांना लस देऊन होत नाही तोपर्यंत पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबईत 24 तास लसीकरण सुरु

सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ आणि ऐरोली येथील 3 रूग्णालये, तुर्भे येथील माता बाल रूग्णालय तसेच 18 नागरी आरोग्य केंद्रे अशा 22 ठिकाणी कोव्हिड 19 लसीकरण केंद्रे सुरू आहेत. तिथे विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळी लस घेता यावी यासाठी महापालिकेच्या तिन्ही रूग्णालयांमध्ये अहोरात्र 24 तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

माता बाल रूग्णालय तुर्भे याठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 18 नागरी आरोग्य केंद्रांठिकाणी सोमवार, बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार असे आठवड्याचे 4 दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे.

15 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु

याशिवाय 15 खाजगी रूग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येत आहे. या खासगी रुग्णालयात प्रतिडोस 250 रुपये इतक्या शासनमान्य दराने लसीकरण केले जात आहे. कोव्हिडची लस अतिशय सुरक्षित असून नागरिकांनी आपला क्रमांक येईल तेव्हा लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा : केंद्रासाठी पेट्रोल-डिझेल नुसती दुभती गाय नव्हे तर सोन्याचे अंडे देणारी कोंबडी!