मनोज लेले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, दापोली | 9 मार्च 2024 : शिवसेना नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांचा तोल गेला. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ऐकेरी उल्लेख करत जोरदार हल्ला चढवला. आपल्याच आमदारांना संपवणारा हा एकमेव नेता आहे, अशी सडकून टीका रामदास कदम यांनी केली. दापोली येथे आज शिवसेनेची सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी रामदास कदम आणि आमदार सिद्धेश कदम यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं.
उद्धव ठाकरे तुम्ही तुमचे चमचे पाठवा. योगेशदादांची ताकद काय आहे हे पाहा. उद्धव ठाकरे यांनी योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना मिटिंग घेत होते. पाच लोक मिटिंगमध्ये होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना चिठ्ठ्या दिल्या. आपल्याच आमदारांना संपवणारा हा पहिला माणूस आहे, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. जो पक्ष वाढवतो, त्यालाच उद्धव ठाकरे संपवत असतात. उद्धव ठाकरे यांनी योगेश कदम यांना बाजूला सारून दापोली नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीला दिली. भाजपकडून मतदारसंघात ढवळाढवळ करण्यात आली, असा गंभीर आरोपही कदम यांनी केला.
आमचे आमदार कमी असतानाही तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. पण उद्धव ठाकरे यांना धडा शिकवणारे तुम्हीच होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांचं पिल्लू आणि टणाटणा उड्या मारणारा अनिल परब हे त्यांच्या जवळपास होते. आता या लोकांनी 14 मार्च रोजी सभा लावावी. फक्त भाड्याने माणसं आणू नका. गवताला भाले फुटले पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची स्तुती केली. एकनाथ शिंदे असताना तटकरे यांच्या तिकीटाची कुणी काळजी करू नये. तटकरे तुम्ही शंभर टक्के निवडून येणार आहात. कोण गिते? त्यांना आम्हीच सहावेळा निवडून दिले. निवडून गेल्यावर पाच वर्ष दिसत नाही. त्यांनी कुणबी समाजाच्या 200 मुलांना नोकऱ्या दिल्याचं दाखवून दिलं तर मी राजकारण सोडेन, असं सांगतानाच तटकरे साहेब इकडे लक्ष द्या, नाही तर गडबड होईलस, असा दमच त्यांनी दिला.