खालापूर | 22 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळगडावर जाऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. उद्धव ठाकरे येताच अनेकांना अश्रू अनावर झाले. दु:खाचा डोंगर अंगावर कोसळल्यानंतर या गावकऱ्यांनी आपल्या समस्यांचा डोंगर उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडला. घटना कशी घडली? लोक डोंगरावर का राहत होते? याची माहिती देतानाच सरकार आणि प्रशासनाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हेही सांगितलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या ग्रामस्थांना धीर दिला. प्रसंगी तुमच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारशीही आपण बोलू. तुमचं नीट आणि चांगलं पुनर्वसन झालं पाहिजे. तुम्ही काही जागा सूचवा तिथे तुम्हाला निवारा देण्याचा आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
तुमच्या राहण्या खाण्याची काय व्यवस्था आहे? तुम्हाला मदत मिळाली का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना केला. तेव्हा प्रीतम म्हात्रे हा तरुण आम्हाला मदत करत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी प्रीतम म्हात्रे यांची आस्थेवाईक विचारपूस केली. त्याची पाठ थोपटली. तसेच काही मदत लागली तर सांग. नक्की करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
स्थळ : पंचायतन मंदिर
ग्रामस्थ : माती आणि दगडं राहिलं आहे. एवढी परिस्थिती भयानक आहे. दाना राहिला नाही, बैलजोडी राहिली नाही, कोंबड्यासकट सर्व सुपडा साफ झाला.
उद्धव ठाकरे : ठिक आहे. या गोष्टी आपण करू शकतो. पण जी लोक गेली ती परत आणू शकत नाही. बरोबर आहे. आता तुम्ही सर्वांनी एक ठरवलं पाहिजे, आहे तिथे पुनर्वसन करायचं की नवीन ठिकाणी करायचं?
ग्रामस्थ : या ग्रामस्थांची 263 एकर शेती आहे. तिथे नाचणी पिकत होती. त्याचाही सातबारा झाला नाही. राज्य पट्टा दिलेला आहे. पण त्याचे सातबारे झाले नाही. (मध्येच एक महिला येऊन वाकून नमस्कार करते. त्यावर ताई वाकू नका. या साईटला या, इकडे उभं राहा, असं उद्धव ठाकरे म्हणतात.) हे लोक डोंगर सोडत नव्हते. का? तर 263 एकर जमीन आहे. त्याचे सातबारे त्यांच्या नावावर आहे. त्यावर त्यांचं उधनसाधन सुरू होतं. नाचणी वगैरे पिकवून ते खाली विकत होते. दुसरा रोजगार काही नाही.
उद्धव ठाकरे : (दोन तरुणांना बाजूला घेऊन) तुम्हाला विषय कळला का ते काय बोलत होते?
तरुण : हो.
ग्रामस्थ : मला विषय पूर्ण करू द्या. आपण तात्पुरती 12 -12 एकर जमीन दिली आहे. त्यावर त्यांचा रोजगार चालतो.
उद्धव ठाकरे : ती जमीन कुठे दिली? डोंगर उतारावरच आहे का?
ग्रामस्थ : हिसाळवाडीलाच आहे.
उद्धव ठाकरे : डोंगर उतारावर आहे की वरती?
ग्रामस्थ : ती सुद्धा धोकादायकच आहे. जगण्याचं साधन जमीनच आहे. एवढी शिकलेल्या मुलांचे साधन जमीनच आहे. आश्रम शाळेत शिकून ही मुलं बेरोजगार आहे. या मुलांना डोंगराच्या बाजूला जायची आता भीती वाटत आहे. 263 एकर जमीन आहे. सातबारे आहे. पण त्यांना जगण्याचं साधन मिळालं, सुविधा व्यस्थित मिळाल्या तर बरं होईल. जे गेले ते येऊ शकत नाही. पण या लोकांसाठी काही करता येऊ शकते. त्या हेतूने तुम्ही विचार करा. तुम्ही फोंड्याला माझ्या घरापर्यंत येऊन गेलेले आहात. माझ्या चुलीपर्यंत आला. माझ्या अंगणातच तुमचा कार्यक्रम झाला. तुमचे पाय लागले, तुम्ही न्याय द्या.
उद्धव ठाकरे : आम्ही सर्वच तुमच्या दुखात सहभागी आहोत. तुम्ही या धक्क्यातून बाहेर या. अं.. तुम्ही संवाद ठेवा…तुम्ही तुमची एक टीम तयार करा. काय करू शकतो. हे सांगा. आपण करू.
ग्रामस्थ : मी शिवसैनिकच आहे. मी पंचायतीवर निवडून आलो आहे.
उद्धव ठाकरे : बऱ्याच वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याची गरज आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर आता काय करायचं हे ठरवा. कुठे पुनर्वसन करायचं ते सांगा. पुन्हा अशी घटना घडू नये. मी या सरकारशी बोलणार आहे. सरकार येत असतं आणि जात असतं. पण तुमचं ठोस पुनर्वसन झालं पाहिजे.
ग्रामस्थ : माझी भावजय डोळ्यासमोर पाहिली. दगडाने चेचून काढली. भाऊ दगडाने चेचून काढला. दोन दोन टीमने दगडं उचलली. तेव्हा ते सापडले. नऊ माणसं अजून तिथेच आहे. प्रत्येक घरात सात सात लोक आहेत.
उद्धव ठाकरे : तुमची इकडे काय व्यवस्था आहे
ग्रामस्थ : साहेब पुरवत आहे. दादा पुरवतात. जेवणा खाण्याची व्यवस्था आहे.
उद्धव ठाकरे : हा दादा तुमच्या मदतीला आला आहे. त्याने सांगितलं जोपर्यंत तुमची नीट पूर्ण सोय होत नाही, तोपर्यंत पूर्ण जबाबदारी त्याने घेतली आहे… प्रीतम… प्रीतम म्हात्रे… त्यांना मी खरोखरच धन्यवाद देतो. दादा, काही लागलं आमच्याकडून आम्ही काही करू शकत असू तर मला जरूर सांग.