निवृत्ती बाबर, टीव्ही9 प्रतिनिधी, खालापूर | 22 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस आहे. आज तिसऱ्या दिवशीही या ठिकाणी शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. मातीचे ढिगारे उपसले जात आहेत. आजही एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून या जवानांनी तात्काळ ढिगारे उपसण्या सुरुवात केली आहे. मात्र, इर्शाळगड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. या दुर्घटनेतील मृत आणि जखमींचे कुटुंबीय आणि शेजारच्या गावातील नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून आहेत. हे कुटुंबीय आणि नातेवाईकही आपल्या आप्तेष्टांचा शोध घेत आहेत. कोण भावाचा शोध घेतंय, तर कोण वडिलांचा शोध आहे. कुणाची आई सापडत नाहीये, कुणाची बहीण तर कुणाची पत्नी तर कुणाचं मुल सापडत नाहीये. कुटुंबीयांचा शोध घेणाऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. रडून रडून घसा सुखला आहे. पण शोध सुरूच आहे.
या दुर्घटनेतून वाचलेल्यांना पंचायतन मंदिर नढाल येथे ठेवण्यात आलं आहे. मात्र काही लोक अजूनही दुर्घटनास्थळी जाऊन आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. तीन दिवस झाले तरी ही शोध मोहीम सुरू आहे. आज ना उद्या आपल्या घरचे लोक सापडतील अशी आशा या लोकांना लागलेली आहे.माझे बाबा आणि भाऊ अजून सापडत नाहीत. सापडतील अशी आशा आहे. मी शेतीसाठी खाली आलो असल्याने मी वाचलो. जेव्हा मला कळलं तेव्हा काय कराव सूचत नव्हतं, अशी हतबल प्रतिक्रिया जनार्दन पांडू पारधी या तरुणाने व्यक्त केली आहे.
घरचे तर गेलेतच पण गावातील नातेवाईक देखील सापडत नाहीत. त्यामुळे आमचं खानदान जमिनीखाली आहे. माती काढण्याच काम सुरूय. पण आमचे नातेवाईक सापडतील अशी आशा आहे, असा आशावाद जनार्दन व्यक्त करतो.
इर्शाळवाडी गावातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. तीन दिवसापूर्वी भरलेल्या या गावात काळाने घात घातला आणि अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्यानंतर आता बचावकार्य सुरु आहे. पण घरातील सर्व संसार माती खाली दडलेला आहे. त्यामुळे आज वाचलेली 5-6 घरातील नागरिकांना देखील डोंगरावरून खाली सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे. घटनास्थळी अत्यंत भयावह स्थिती आहे.
इर्शाळवाडीत सकाळीच एनडीआरएफचे जवान दाखल झाले. एनडीआरएफची चार पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे पथक शोधकार्य करत आहे. आजही दिवसभर मदतकार्य सुरू राहणार आहे. आजच्या दिवसच या ठिकाणी मदतकार्य करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.