‘वाईट झालं की मला लय शिव्या पडतात’, धनंजय मुंडे असं का म्हणाले?

| Updated on: Sep 25, 2024 | 9:22 PM

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला. "राज्यात पाऊस कमी पडो की जास्त पडो, अथवा विमा अन अनुदान उशिरा मिळो, शिव्या या कृषी मंत्र्याला खाव्या लागतात", असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

वाईट झालं की मला लय शिव्या पडतात, धनंजय मुंडे असं का म्हणाले?
धनंजय मुंडे
Follow us on

“राज्यात पाऊस कमी पडो की जास्त पडो, अथवा विमा अन अनुदान उशिरा मिळो, शिव्या या कृषी मंत्र्याला खाव्या लागतात. त्यामुळे मला रोज रात्री उचक्या येतात”, असं वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. कृषी खातं हे साधंसुधं नाही, हे सांगताना चांगलं झालं तर लोक साधं कौतुकही करत नाहीत. पण वाईट झालं की शिव्यांची लाखोली वाहतात, असं धनंजय मुंडे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात धनंजय मुंडे बोलत होते. तुम्ही कशाला कृषी मंत्री झालात, असं मला इन्शुरन्स कंपन्या म्हणत असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांना कितीही दिलं तरी ते कमीच आहे, असंही मुंडे यावेळी म्हणाले. तसेच लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवरही मुंडेंनी तोंड सुख घेतलं. काहीही झालं तरी सत्ता आमचीच येणार, तेव्हा कृषीमंत्री पद मला मिळावं यासाठी आमदार दिलीप मोहितेंनी पाठपुरावा करावा, अशी सादही धनंजय मुंडेंनी यावेळी घातली. या कार्यक्रमानंतर मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

राज्यात परतीच्या पावसाने नुकसान, मदत कधी?

राज्यभर मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. 15 दिवसांपूर्वी मराठवाड्यातील काही भाग आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्याठिकाणी मदत देण्याचा निर्णय झाला. 300 कोटींचा निधी देण्यात आला. आता पुण्यात ज्या-ज्या ठिकाणी पावसामुळे नुकसान झालंय, तिथले पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तिथंही लवकरचं आर्थिक मदत केली जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

राज्यात कांद्याचे भाव का पडले?

अफगाणिस्तानचा कांदा निर्यात केल्यानं, भाव पडले का? या मुद्द्यावरही कृषीमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. “ही बातमी खोटी आहे की खरी आहे. याबाबत मला आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही. अगोदर केंद्र सरकारशी बोलावं लागेल. त्यामुळे कांदा आयात केल्याच्या बातमीबद्दल आत्ताच बोलणार नाही, माहिती घेऊन संध्याकाळी बोलतो”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादीकडून भाजप-शिंदे गटाची कोंडी?

राष्ट्रवादीकडून भाजप-शिंदे गटाची कोंडी केली जातीये का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावरही मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. “महायुती ही एकसंघ आहे. आमचं ठरलंय, कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची आहे. विनाकारण आम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे या बातम्या देणं बंद करा. सर्वात आधी आम्ही जागा निश्चित करू अन उमेदवारांची देखील घोषणा करू”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या प्रश्नावर काय म्हणाले?

यावेळी धनंजय मुंडे यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावरही उत्तर दिलं. “त्यांची तब्येत व्यवस्थित नाही. आधीच काही जिल्ह्यातील सामाजिक सलोखा पूर्णपणे संपलेला आहे, तो पूर्ववत करणं गरजेचं आहे. त्यांची तब्येत पाहता, त्यांनी उपोषण थांबवलं, या गोष्टी सरकार सकारात्मक घेत आहे”, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.