गणेश विसर्जन होताच राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडींना वेग, ‘देवगिरी’वर आमदारांना तडकाफडकी बोलावलं

| Updated on: Sep 18, 2024 | 7:48 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अजित पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांना अतिशय महत्त्वाच्या सूचना देणार असल्याची माहिती मिळत आहे.

गणेश विसर्जन होताच राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडींना वेग, देवगिरीवर आमदारांना तडकाफडकी बोलावलं
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राज्यभरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून गणेशोत्सवाचा उत्साह होता. पण आता गणेशोत्सव संपला आहे. राज्यभरात गणेश विसर्जन पार पडलं आहे. गणेश विसर्जन पार पडल्यानंतर लगेच आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीची आज मुंबईत एका हॉटेलमध्ये जागावाटपासाठी बैठक पार पडत आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी आज त्यांच्या पक्षाच्या सर्वच आमदारांना तातडीने मुंबईत त्यांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठकीसाठी बोलावलं आहे. अजित पवारांनी आपल्या आमदारांना तडकाफडकी बोलावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत काय चर्चा होणार?

  1. अमित शाह यांनी भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत जुळवून घ्या, अशा सूचना दिल्यानंतर आज अजित पवार आपल्या आमदारांना आपल्याला घटक पक्षांसोबत जुळवून घ्यायचं आहे, या संदर्भात सूचना करणार आहेत. तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिथे संघर्ष आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याबाबत अजित पवार आपल्या आमदारांना सूचना देणार आहेत.
  2. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महामंडळ वाटपावरून नाराजी आहे. अनेक पदाधिकारी नाराज आहेत. आजच्या बैठकीत यावर देखील चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महामंडळांच्या पदाचं वाटप केलं, राष्ट्रवादीच्या वाट्याला काय? असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. याबाबत अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
  3. नियोजन विभागाच्या माध्यमातून कामांच्या याद्या मागविण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप जुलै महिन्यापासून आमदारांना निधी देण्यात आलेला नाही. याबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादीच्या युवती पक्षाचा प्रचार करणार

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युवती संघटनेची बैठक पार पडली आहे. आमदार शिवाजी गर्जे, आमदार सुनील शेळके आणि प्रदेशाध्यक सुनील तटकरे यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या उपस्थित अनेक युवती उपस्थीत होत्या. या बैठकीत आतापर्यंतच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे युवतींना आदेश देण्यात आले. मोफत शिक्षण बार्टी सार्थी ह्याचा निधी सर्वांपर्यंत पोहचविण्याचं काम युवतींकडे सोपवण्यात आलं. योजनांची स्वाक्षरी मोहीम युवती संघटना घेणार आहे. योजनांची रांगोळी काढून पक्षाचा प्रचार केला जाणार आहे. तसेच राज्यभर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुलीच्या वसतिगृहात जनजागृती केली जाणार आहे. तसेच गॅस सिलेंडर सारख्या योजना युवती लोकांपर्यंत पोहचविणार आहेत.