NCP announces third list: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमुळे फलटन मतदार संघातील वाद मिटला असल्याचे समोर आले. फलटन मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे दिगंबर आगवणे यांनी तयारी सुरु केली होती. त्यांचे नाव सोशल मीडियावर फिरत होते. परंतु आता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तसेच महायुतीत दहा जागांवर चर्चा सुरु आहे. त्याचा निर्णय दुपारपर्यंत येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नवाब मलिक यांच्यासंदर्भात तटकरे यांनी विधान केले.
सुनील तटकरे म्हणाले, अर्ज भरण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहेत. महायुतीमध्ये आता दहा जागांचा निर्णय प्रलंबित आहे. तो दुपारपर्यंत येणार आहे. आज आम्ही चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करत आहोत. त्यात गेवराई विजयसिंह पंडीत, फलटण मतदार संघातून सचिन पाटील, निफाडमधून दिलीपकाका बनकर तर पारनेर मतदार संघातून काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे.
फलटण विधानसभा मतदार संघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाकडून दावा केला जात होता. मागील विधानसभा निवडणुकीत 2019 या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दीपक चव्हाण विजयी होते. त्यांना निवडणुकीत 1 लाख 17 हजार 617 मते मिळाली होती. तर भाजपच्या दिगंबर आगवणे यांना 86 हजार 636 मते मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात सुनील तटकरे यांनी वक्तव्य केले. नवाब मलिक यांनी पक्षातील नेते भेटत आहे, त्यांची समजूत काढली जात आहे का? त्यावर ते म्हणाले नवाब मलिक हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे सहकारी आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटत असतो. शिवाजी नगर – मानखुर्द उमेदवाराची लवकरच घोषणा करू, असे ते म्हणाले.