सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला राष्ट्रवादीचा निकालामुळे अजितदादा गटातले काही नेते आपल्या मुलांसाठी प्लॅन बी आखत असल्याच्या चर्चा आहेत. नरहरी झिरवाळांपासून सुरु झालेला हा सिलसिला वाढत चाललाय. दरम्यान दोन महिन्यांपूर्वी मुलानं घेतलेल्या भूमिकेवर नरहरी झिरवाळ काय म्हणाले? ते देखील महत्त्वाचं आहे. फक्त भेटीसाठी आपल्या मुलाला आपणच शरद पवार गटाच्या सोहळ्यात पाठवल्याचा खळबळजनक दावा नरहरी झिरवाळ यांनी केलाय. काही महिन्यांपूर्वी झिरवळ यांच्याहून वेगळी भूमिका घेत त्यांचा मुलगा गोकूळ झिरवळ शरद पवार गटाच्या कार्यक्रमात गेला होता. त्याठिकाणी उमेदवारीचीही इच्छा झिरवळांच्या मुलानं व्यक्त केली. त्यावेळी आपला मुलगा कुठेही जाणार नसल्याचं सांगणाऱ्या झिरवळांनी आता वेगळा दावा केलाय.
तूर्तास या भूमिकेवर झिरवळांच्या मुलाची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. दोन महिन्यांपासून ते मीडियापासून लांब आहेत. मात्र मुलाला शरद पवार गटाच्या कार्यक्रमात पाठवून झिरवाळांनी दबावतंत्रानं महायुतीत आपली उमेदवारी पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे.
जयंत पाटलांच्या कार्यक्रमात हजेरीनंतर आपण निष्ठावंत असल्याचा दावा गोकूळ झिरवळ यांनी केला होता. मात्र तुम्ही निष्ठावान असाल तर वडिलांनी गद्दारी केली का? या प्रश्नावर मात्र ते गडबडले होते. तूर्तास एक चर्चा अशीही आहे की, अजित पवार गटातल्या अनेक नेत्यांना सुप्रीम कोर्टातल्या निकालाचीही धाकधूक आहे. त्यामुळे विपरीत निकाल लागल्यास प्लॅन बी म्हणून अजित पवार गटातलेच काही नेते आपल्या मुलांसाठी प्लॅन बी तयार ठेवत आहेत
कारण, धर्मारावबाबा आत्राम अजित पवार गटाते मंत्री आहेत. त्यांच्या मुलीनं शरद पवार गटात प्रवेश केलाय. नरहरी झिरवाळांची उमेदवारी अजितदादा गटाकडून जाहीर झालीय. मात्र त्यांचा मुलगा जयंत पाटलांच्या कार्यक्रमात हजेरी लावून उमेदवारीची इच्छा वर्तवून आलाय. दिलीप वळसे पाटील अजित पवार गटाचे मंत्री आहेत. मात्र त्यांची मुलगी सुद्धा शरद पवारांच्या गटाकडून इच्छूक असल्याच्या चर्चा आहेत. अजितदादा गटाचे माढ्यातील आमदार बबन शिंदेंचा मुलानं शरद पवारांची भेट घेतली होती.