उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेर जे साध्य करायचं होतं ते त्यांनी केलं, असं म्हणायला आता हरकत नाही. कारण बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यांच्या बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून लोकसभेत जोरदार प्रचार करण्यात आला. पण या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. पण अपयश आलं तरी खचायचं नाही आणि पुढे चालायचं या विचाराप्रमाणे अजित पवार यांनी पुढे जायचं ठरवलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
देशात मोदी 3.0 सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने अजित पवार गटाला राज्यसभेत एक जागा दिला आहे. खुद्द अजित पवार यांनी संसदेत आपली संख्या वाढेल, असे संकेत दिले होते. यानंतर आता राज्यसभेत रिक्त असलेल्या एका जागेवर अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे लोकसभेत 1 खासदार आणि राज्यसभेचे 2 खासदार होणार आहेत. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे संसदेत बारामतीचे आता दोन खासदार असणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. शरद पवार गटाकडून ही राज्यसभा आपल्याला मिळाल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी 27 फेब्रुवारीला 2024 ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. या जागेचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत असणार आहे. याच जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या कार्यात आहेत. सुनेत्रा पवार या प्रसिद्ध शैक्षणिक संस्था विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. त्यांनी 2024 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. त्यानंतर अखेर सुनेत्रा पवार यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.