प्रदीप कापसे, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाची दिल्लीत आज महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर निशाणा साधला. अजित पवार गट हा ईडीच्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेलाय, असं शरद पवार यावेळी म्हणाले. अजित पवार यांच्या गटाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यांच्या या भेटीबाबत शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर सडकून टीकाही केली.
“अजित पवार गटाची अध्यक्ष पदाची निवड चुकीची आहे. निवडणुकीची पद्धत कशी असावी हे मी त्यांना सांगितलं. जे आज म्हणतात की ही निवडणूक योग्य नव्हती. मात्र यावर त्यांच्या सह्या आहेत. आम्ही एकत्र बसलो, चर्चा केली. जे लोक गेलेत ते म्हणतात की पक्ष आम्हाला मिळेल, चिन्हा मिळेल. जे अजून व्हायचे आहे ते कसं सांगतात की हा निर्णय आमच्या बाजूने लागेल? मला कळत नाही हे असं कसं असू शकतं?”, असे प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केले.
“जे लोक सोडून गेलेत त्यांच्या बोलण्याला काय आधार आहे? चिंता करण्याची गरज नाही. यापूर्वी काँग्रेसचीदेखील चिन्ह बदलली होती. काँग्रेस चे दोन भाग झाले होते. काँग्रेस आय आणि काँग्रेस ओ. निवडणूक चिन्ह हा महत्त्वाचा आधार आहे. चिन्ह गेलं तरी लोक बदलत नाहीत. मी पहिली निवडणूक लढलो. मी उमेदवार होतो. चिन्ह बैलजोडी होतं. त्यावर मी लढलो, निवडून आलो”, असं शरद पवार म्हणाले.
“3 वर्ष संघर्ष झाला. निवडणूक आयोगानं चिन्ह चरखा दिलं. तरीही मी जिंकलो. आणीबाणी आली. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होतं. या निवडणुकीत हरल्या. त्यानंतर परत चिन्ह बदललं. गाय वासरू आलं. चौथं हात, पाचवं चिन्ह घड्याळ आलं. चिन्ह बदलण्याचा प्रयत्न होवू शकतो. मात्र चिंता करण्याची गरज नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे उद्घाटन करायला जातात आणि त्यांची रेल्वे ही विरोधी पक्षावर सुरु होते. भोपाळला गेल्यावर भाषण दिलं की राष्टवादी पार्टी भ्रष्ट आहे. जर पार्टी भ्रष्ट आहे तर चौकशी करा आणि जर खरं असेल तर कारवाई करा. मात्र ज्यांच्याविरोधात आरोप केला ते आज राज्य मंत्रिमंडळात आहेत”, असं शरद पवार म्हणाले.
“8 लोकांना मंत्रिमंडळात सहभागी केलं. हे लोक मला भेटयाला आले होते. आमच्या विरोधात ईडीची कारवाई होतेय. यातून काही मार्ग काढा. तुम्ही आला नाहीत तर ईडी येईल, अशी विनंती केली”, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी यावेळी केला. “काही इमानदार कार्यकर्ते होते. त्यापैकी एक अनिल देशमुख. त्यांनी पक्ष सोडला नाही”, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.