नवी दिल्ली | 17 ऑक्टोबर 2023 : सुप्रीम कोर्टाने आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजांवर ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याचिकांच्या सुनावणीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यासाठी 30 ऑक्टोबर ही तारीख दिलीय. विधानसभा अध्यक्षांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यासाठी ही शेवटची संधी आहे, असं कोर्टाने स्पष्ट बजावलंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांच्या कामकाजांवर नाराजी व्यक्त केली. दसऱ्याच्या सुट्टीत अध्यक्षांसोबत बसा आणि वेळापत्रक ठरवा, अशा सूचना कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आजच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात गेले होते. सुनावणी पार पडल्यानंतर दोन्ही नेत्यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी कोर्टात काय-काय घडलं याविषयी माहिती दिली.
दरम्यान, “अजित पवार गटाचं काय म्हणणं आहे ते महत्त्वाचं नाहीय. कोर्टाचं काय म्हणणं आहे ते महत्त्वाचं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचे प्रकरण एकत्रित केले आहेत. त्याचे कागदपत्रे तुम्ही सर्वांना पाहिले आहेत’, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
“कोर्ट नाराजी व्यक्त करत होतं. कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मुलाखतीवर नाराजी व्यक्त केली. राहुल नार्वेकर बाहेर जावून सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांबद्दल बोलत आहेत याबद्दल कोर्टाने स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय. एकवेळ अशी आली होती की, आम्ही आता आम्हीच तुम्हाला वेळापत्रक देतो. यांचं नशीब चांगलं की तिथे तुषार मेहता उभे होते. त्यांनी कसंबसं वेळ सावरुन नेली आणि 30 तारखेपर्यंत वेळ मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
“एक स्पष्ट झालंय, कोर्ट अध्यक्षांच्या कामकाजावर प्रचंड नाराज आहे. लोकसभेच्या निवडणुकांआधी यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. कोर्टाने शेवटची संधी दिलीय. सुप्रीम कोर्टाचे आदेश विधानसभा अध्यक्ष मानणार नसतील तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला लक्ष घालावं लागेल. मला वाटतं सुप्रीम कोर्ट 30 तारखेला निर्णय घेईल”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.