प्रदीप कापसे, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह नेमकं कुणाचं याबाबत आज ही सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी संध्याकाळी चार वाजता सुरु होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच नवी दिल्लीत हालचालींना वेग आलाय. शरद पवार हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनाने आजची बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, तसेच शरद पवार यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आले आहेत. इंडिया आघाडी विषयी महत्त्वपूर्ण चर्चा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी होऊ शकते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटप कशी असावी, इंडिया आघाडीची रणनीती कशी असावी, याबाबतची चर्चा सुद्धा आजच्या बैठकीत होऊ शकते. इंडिया आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. पण इंडिया आघाडीच्या सभांची सुरुवात नेमकी कुठून करावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची नेमकी रणनीती काय असावी, याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते. राहुल गांधी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित असल्याने आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. कदाचित काँग्रेस हायकमांड आज शरद पवार यांच्याशी चर्चा करेल. त्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना माहिती देण्यात येईल.
दरम्यान, आजची बैठक महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावर सुनावणी पार पडतेय. त्यावर राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.