बदलापुरातील संतापजनक घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटात आज मराठवाड्यातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार यांनी बदलापुरात काल उसळलेल्या आंदोलनावर भूमिका मांडत जनतेला आता परिवर्तन हवं असल्याचं म्हटलं. “लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काल बदलापूरला हेच पाहायला मिळालं. याचा अर्थ एकच की जनता शांत बसणारी नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“जनमानस वेगळा होता. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची 4 आणि काँग्रेसची केवळ 1 लोकसभेची जागा होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत लोकसभेच्या 48 पैकी 31 जागा महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवे होते”, असं मत शरद पवार यांनी मांडलं.
“आता विधानसभा निवडणूक आहे. ठिकठिकाणी सहकारी भेटत आहेत. अंदाज घेत आहेत. ठिकठिकाणी हेच चित्र दिसत आहे. लोकांना बदल पाहिजे. एखाददुसरा गंभीर प्रसंग आला, तर लोकांची प्रतिक्रिया किती तीव्र असते, याचे उदाहरण काल ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे पाहिले. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात. याचा अर्थ लोकांमध्ये खूप अस्वस्थता आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“एनसीपी, काँग्रेस, शिवसेनेने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. लोकं साथ देतील. लोकांच्या मनात काम करणारे जाणकार त्यांच्यासाठी पक्ष शोधत आहेत. दोन महिने हातात आहेत. त्याचा उपयोग परिवर्तनासाठी करा. शेवटच्या माणसापर्यंत जा, आपली विचारधारा पटवून द्या. तुमचं एनसीपीत अंत:करणापासून स्वागत, असा शब्दांत शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. “अनेक वर्षे तुम्ही शैक्षणिक जीवनात काम करत आहात. सरकार आणण्यासाठी सामूहीक प्रयत्न करावे लागतील. तुमचे सर्वांचे स्वागत करतो. तुम्ही येण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्याचा पुरेपुर उपयोग परिवर्तनासाठी केला पाहिजे”, असंदेखील आवाहन शरद पवारांनी यावेळी केलं.