नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीत 8 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं आहे. शरद पवार हेच पक्षाचे मुख्य नेते असतील, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह 9 आमदार आणि 2 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. देशातील 27 राज्यांचे राष्ट्रवादी पक्षाचे युनिट हे शरद पवार यांच्या सोबत आहे. कुठलेच राज्य फुटले नाही. महाराष्ट्रातील पक्षाचे नेते सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहे. महाराष्ट्रातील आमदार म्हणजे पक्ष नव्हे, असं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.
“आपल्याला माझ्या सहकाऱ्यांनी बैठकीत काय घडलं त्याची माहिती दिली आहे. सर्व नेते बैठकीसाठी आले, याचा मला आनंद आहे. त्यांचा उत्साह चांगला आहे. पक्षाला वाचवण्याचं काम ते करत आहे. एवढ्या मजबुतीने काम करण्याची मानसिकता आम्हाला सर्व सहकाऱ्यांकडून अपेक्षित होती. आजची बैठक ही आमचा उत्साह वाढवणारी ठरली आहे. आम्ही जे निर्णय घेतले आहेत ते आपल्याला सांगण्यात आलं आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
“अजित पवार यांच्याबद्दल कोणी काय सांगितलं ते मला माहिती नाही. मला एक गोष्ट माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे. दुसरे कुणी काही दावा करु शकतात. पण ते सत्य नाही. कार्यकारी बैठक ही पक्षाच्या घटनेनुसार आहे. कुणी काही बोललं असेल तर त्याला महत्त्व नाही आणि ते चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी अजित पवारांना दिली. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बैठकीवर आक्षेप घेतलाय. त्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
“कुणाला पंतप्रधान बनायचं असेल किंवा मुख्यमंत्री बनायचं असेल तर त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही”, असा टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला. “वय 82 असो किंवा 92 त्याचा फार काही फरक पडत नाही. वेळ आल्यावर कुणाच्या पाठीमागे किती आमदार आहेत ते स्पष्ट होईल”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
“आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. आम्हाला जे काही सांगायचं आहे ते निवडणूक आयोगासमोर सांगू. तिथे जी लीगल पोजिशन आहे ते पाहिल्यानंतर निर्णय होईल. पण तो निर्णय अनपेक्षित लागला तर आम्ही वेगळ्या ऑथिरिटीकडे (सुप्रीम कोर्ट) जाण्याचा विचार करु. पण तशी वेळ येईल, असं मला वाटत नाही”, असं म्हणत शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टातही जाण्याचे संकेत दिले आहेत.
“चिठ्ठीच्याबाबत निवडणूक आयोग ठरवेल. या देशात महत्त्वाचे कागदपत्रे इथून तिथे जाण्यासाठी पाच दिवस लागतात का ते मला माहिती नाही. निवडणूक आयोग याबाबत ठरवेल”, असं शरद पवार म्हणाले. “बघू. वेळ येईल. आम्हाला विश्वास आहे की, निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. लोकांचं काय मत आहे ती मी जाणतो. आम्हाला तरुणांचं समर्थन मिळत आहे”, असंही पवार म्हणाले.
“भाजप आज सरकार विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडी, सीबीआय आणि इतर संस्थांचा वापर करत आहे. काही महिन्यांनी निवडणूक होईल. त्यानंतर सरकार बदललं की या संस्था स्वायत्ता ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल”, असा इशारा शरद पवार यांनी दिला. “२०२४ मध्ये सत्तापालट होईल, याचा मला विश्वास आहे. विरोधकांविरोधात जे पाऊल उचलण्यात आलं आहे त्याची किंमत तेव्हा त्यांना द्यावी लागेल”, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ही चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. “जे काही होत आहे त्याचा मला आनंद आहे. जे चुकीच्या निर्णयाला गेले आहेत त्यांना किंमत चुकवावी लागेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राचे नागरीक सत्ता देतील”, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.