NCP Sharad Pawar | शरद पवार यांचा आजचा दिवसभरातील कार्यक्रम कसा असेल? जाणून घ्या

| Updated on: Jul 03, 2023 | 7:51 AM

NCP Sharad Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा भूकंप झाला आहे. पुढचे काही दिवस त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटलेले दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रीय झाले आहेत. आजपासून त्यांचा दौरा सुरु होईल.

NCP Sharad Pawar | शरद पवार यांचा आजचा दिवसभरातील कार्यक्रम कसा असेल? जाणून घ्या
NCP Chief Sharad Pawar
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काल मोठा भूकंप झाला. रविवार सुट्टीचा दिवस असूनही राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. दुपारी अचानक अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होणार असल्याचा बातमी आली. राजकीय जाणकारांसह सर्वसामान्यांना या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवारांनी पक्षात बंड केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे.

रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात दुपारनंतर मोठी हालचाल दिसून आली. तिथल्या कार्यक्रमाचे, उपस्थित नेत्यांचे जे फोटो समोर आले, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

किती आमदारांचा पाठिंबा ?

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या बंडात अजित पवारांसोबत आहेत. महत्वाचे म्हणजे हे तिन्ही नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय, विश्वासू मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे आतापर्यंतच सर्वात मोठ बंड आहे. अजित पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, ते स्पष्ट झालेलं नाहीय. काल राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आपण अजूनही शरद पवार यांच्यासोबतच असल्याच सांगितलं.

राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याच बोलल जातय. अजित पवारांनी काल शपथविधीनंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्याविषयी काहीही वक्तव्य केलं नाही. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो आहोत, असं सांगितलं. त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर, निवडणूक चिन्हावर दावा सांगितला आहे.

शरद पवार यांचा आजचा कार्यक्रम कसा असेल?

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पुन्हा नव्या ताकदीने उभे राहू असं सांगितलय. राजकीय जीवनात हे पहिल्यांदा असं घडलेलं नाहीय, असंही शरद पवार म्हणाले. शरद पवार आता पुण्यामध्ये आहेत. आज सकाळी 8 वाजता शरद पवार कराडच्या दिशेने रवाना होणार आहे. 11 वाजता ते यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. 11.15 वाजता ते कराडहून साताराला रवाना होतील. त्यानंतर 3.30 वाजता साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होतील.