Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता लवकरच 2100 रुपयांचा हप्ता येणार? अजित पवारांच्या शिलेदाराचा मोठा दावा

| Updated on: Dec 22, 2024 | 3:44 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या प्रचंड चर्चेत आहे. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. या योजनेच्या माध्यमातून अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची मदत दिली जात आहे. पण आता हीच रक्कम 2100 रुपये केली जाण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता लवकरच 2100 रुपयांचा हप्ता येणार? अजित पवारांच्या शिलेदाराचा मोठा दावा
Follow us on

राज्यातील कोट्यवधी महिला या लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा रखडलेला हप्त्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील? असा प्रश्न महिलांना सतावत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असल्याने महिलांना या योजनेचे पैसे मिळाले नाहीत. तसेच महायुतीने दिलेल्या आश्वासनानुसार आता सरकारला लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपयांची आर्थिक मदत द्यावी लागणार आहे. महिलांच्या बँक खात्यात हे लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये कधी येतील? याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्या जवळचे शिलेदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे आनंद परांजपे यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली आहे.

“उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा अर्थ आणि नियोजन खातं मिळालं आहे. त्याचप्रमाणे आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खातं मिळालं आहे. महाराष्ट्राचे युती सरकार 2100 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना मानधन करेल, त्याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अत्यंत सविस्तरपणे परभणीचा विषय असेल किंवा बीडचा विषय असेल, यावर उत्तर दिलेलं आहे. विरोधकांना या विषयावर केवळ राजकारण करायचं आहे. सरकार अत्यंत गतिमान आहे”, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे परभणी दौऱ्यावर येणार आहेत.त्यांच्या या दौऱ्यावरही आनंद परांजपे यांनी टीका केली. “राहुल गांधी यांना संसदेमध्ये काही काम उरलं नाही. ते येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. पण विरोधकांनी बीडच्या घटनेवरनं आणि परभणीच्या घटनेवरून फार राजकारण करू नये. महाराष्ट्राची शांती आणि जातीय वातावरण बिघडेल, असं विरोधकांनी करू नये”, असं आनंद परांजपे म्हणाले.

‘महायुतीत नाराजी नाही’

“सर्व मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे. मी खास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना अभिनंदन करायला आलो होतो”, असं आनंद परांजपे म्हणाले. “ज्यांना संधी मिळाली त्यांना मिळाली. ज्यांना मिळाली नाही त्यांना पुढच्या अडीच वर्षात संधी मिळेल, असे आश्वासन दिलेलं आहे. महायुतीत कोणीही नाराज नाही. ज्यांची नाराजी असेल त्यांची लवकरच दूर होईल”, असा देखील दावा परांजपे यांनी केला.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर परांजपे काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही भावंडांची आज कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घडून आली. या भेटीवरही परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. “अनेकदा ते एकत्र भेटले आहेत. दोघांचे राजकीय विचार वेगवेगळे आहेत. दोघांचे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. त्यात फार काही नाही. तसेच कौटुंबिक भेटीमध्ये राजकारण करावसं मला वाटत नाही”, असं आनंद परांजपे म्हणाले.

छगन भुजबळ यांची नाराजी दूर होईल?

यावेळी आनंद परांजपे यांना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली. “याबाबत अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत. त्यांची नाराजी देखील येणाऱ्या दिवसात दूर होईल”, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली.

पालकमंत्रीपदाबाबत निर्णय कधी?

यावेळी आनंद परांजपे यांनी पालकमंत्री ठरण्याबाबतचा निर्णय कधी होईल? या प्रश्नाचं देखील उत्तर दिलं. “हा निर्णय मुख्यमंत्र्याचा असतो. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून त्याबाबतचा लवकरात लवकर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली.