नागपूर | 11 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना सुप्रीम कोर्टाकडून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांना तब्बल दीड वर्षांनी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. सुप्रीम कोर्टाने प्रकृतीच्या कारणासाठी नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केलाय. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असल्याची बातमी समोर आली होती.
नवाब मलिक यांना मुंबईत विशेष पीएमएलए कोर्टाने खासगी रुग्णालयात उपचारासाठी देखील परवानगी दिली होती. मलिक यांना किडनीशी संबंधित आजार आहे. या आजारावर उपचार घेण्यासाठी नवाब मलिक यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर मलिक यांना आज उपचारासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख यांनी मलिकांना जामीन मिळाला याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया दिली. देशात सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातोय, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचादेखील आरोप देशमुखांनी केला.
“कोर्टाकडून कुणाकडून काय बाजू मांडण्यात आली, याबाबतची डिटेल्स आता येईल. पण सर्वोच्च न्यायालयाने बेल दिली हे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टात काय झालं, कुणी बाजू मांडली, सरकारच्या बाजूने कुणी बाजू मांडली की याबाबत माहिती घेऊ”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
“ईडीची कारवाई ही राजकारणासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात येत आहे. पण आज सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिला आणि नबाव मलिक यांना बेल दिली, त्यामुळे मोठा दिलासा नवाब मलिक आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मिळाला आहे. याचा मला अतिशय आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.
“नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला याचा सर्वांना आनंद आहे. जवळपास दीड वर्षांपासून नवाब मलिक जेलमध्ये होते. एक खोटा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे, संस्थांचा दुरुपयोग करुन राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवून कारवाई केली जात आहे”, असा आरोप त्यांनी केला.
“महाराष्ट्राच्या बाहेरही तुम्ही बघा, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, राजस्थान अशा सर्व ठिकाणी, जिथे विरोधक आहेत त्यांना त्रास देण्याचं आणि जेलमध्ये टाकण्याचं काम सुरु आहे. यंत्रणांचा यासाठी गैरवापर केला जातोय हे अतिशय दुखद आहे”, अशी भावना अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.