राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्यामुळे ते नाराज झाले आहेत. छगन भुजबळ बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. छगन भुजबळ यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा मी होतो आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली. सर्व म्हणत आहेत तर ठीक आहे, मी राहीन तुमच्यासोबत, असं सांगितलं. मी त्यांच्याबरोबर राहून पुन्हा सर्वांचे वार मीच झेलले”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“येवल्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली, ओबीसीचा लढा झाला, बीडमध्ये आमदारांची घरे पेटवली गेली, अनेकांची मालमत्ता जाळल्या गेल्या, त्यावेळी कुणीच बोलत नव्हतं. बीडमध्ये कुणी जायला मागेना, निषेध व्यक्त करायला मागेना, त्यावेळेला मी गेलो. मी जे पाहिलं ते भयान होतं. कुणीची काही करु शकत नव्हतं आणि अख्खं बीड पेटलेलं आहे. अशा वेळेला मी म्हटलं की, आता गप्प बसणार नाही. मी माझा आवाज उठवण्याचं ठरवलं. मागच्या वर्षी 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला, अंबडला ओबीसी एल्गारच्या रॅलीसाठी रवाना झालो. त्यावेळेस मी ठरवलं की मला मंत्रिपदाची पर्वा नाही. मागासवर्गीयांचे प्रश्न असतील आणि ते मी सोडवू शकत नसेल तर मग मंत्रिपदावर राहून काय करायचं?”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“मला अंबडला जात असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला, पण राजीनाम्याच्याबाबत काही बोलू नका. मी त्याबाबत काही बोललो नाही. मला राजीनामा दिल्यानंतरही अडीच महिन्यांपर्यंत सर्वजण बोलत होते की, राजीनामा देवून का नाही बोलत? विधानसभेत सुद्धा बोलत असताना मी एकटा बोलत होतो, सुप्रीम कोर्टाचे सर्व कागदपत्रे घेऊन मी माझा मुद्दा मांडत होतो. त्यावेळेला मागून आणि पुढून दोन्ही बाजूने माझ्यावर राजीनामा द्या, अशी मागणी झाली. पण मी गप्प बसलो. पण एका विशिष्ट प्रसंगी अती झालं आणि जे आमदार अती माझ्याविरुद्ध जे बोलले, त्यावेळेला मी सांगितलं की, राजीनामा दिला आहे”, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
“प्रश्न राजीनामा देण्याचा किंवा मंत्रिपदाचा असण्या-नसण्याचा नाहीय. एक ज्येष्ठ माजी मंत्री, मी सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहे. मी केवळ शोभेसाठी मंत्रिपद घेतलं नाही. सक्रिय राहिलो. लढा देत राहिलो. अशा वेळेला हा संपूर्ण ओबीसी समाज महायुतीच्या पाठिशी पूर्णपणे उभा राहिला आणि लाडकी बहीण सुद्धा उभी राहिली. प्रचंड बहुमत मिळालं. आम्हाला वाटत होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 पर्यंत आमदार येतील. पण 41 पर्यंत आले. बाकीचे दुसऱ्या दोन पक्षांचे सुद्धा आमदार निवडून आले. ठीक आहे, मंत्रिमंडळ करत असताना, जुने आणि नवीन यांचा मेळ घालूनच मंत्रिमंडळ करावं लागतं. जुने झालं द्या फेकून असं चालत नाही”, अशा शब्दांत भुजबळांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना सुनावलं.