महायुतीमध्ये नाशिकच्या जागेचा मुद्दा प्रचंड गाजतोय. अजूनही नाशिकमधून महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांची नाव चर्चेत आहेत. भाजपाचे स्थानिक पदाधिकारी सुद्धा या जागेवर दावा सांगतात. त्यामुळे नाशिकचा पेच अजून सुटलेला नाही. हेमंत गोडसे यांनी शक्तीप्रदर्शन करुन मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली. त्यांना लवकरच तुमच्या नावाची घोषणा होईल, असं आश्वासन देण्यात आलं. पण अजूनही नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.
“नाशिकमधून मी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून शिरूरमधून लढता का असं विचारलं होतं” असं छगन भुजबळ म्हणाले. शिरुरमधून महायुतीने आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आढळराव पाटील शिवसेना शिंदे गटात होते. पण उमेदवारीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. “शिरूरमध्ये देखील मोठया प्रमाणात ओबीसी समाज आहे. मी शिरूरमधून निवडणूक लढवली तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता” असं छगन भुजबळ म्हणाले. ‘मात्र, मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही’ असं त्यांनी सांगितलं.
‘त्याला मी पुतना मावशीचे प्रेम म्हणणार नाही’
“विजय वडेट्टीवार माझ्याबद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून ते बोलले असतील. पक्षाच्या अडचणीमुळे ते माझ्यासोबत व्यासपीठावर येत नाहीत. त्याला मी पुतना मावशीचे प्रेम म्हणणार नाही. मी लढलो असतो तर जिंकून आलो असतो” असं छगन भुजबळ म्हणाले.