‘तुम्हाला काय माहिती माझ्या मनात काय दु:ख’, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

| Updated on: Jun 13, 2024 | 3:26 PM

"तुम्हाला काय माहिती माझ्या मनात काय दु:ख आहे. तुम्ही माझ्या मनात गेले आहेत का? असं कसं होतं? पक्षात असं मागितलं जातं. कुणाला मिळतं तर कुणाला नाही मिळत. पक्षात शिस्त पाळावी लागती", अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

तुम्हाला काय माहिती माझ्या मनात काय दु:ख, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
छगन भुजबळ
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची एक जागा सध्या रिक्त आहे. या जागेसाठी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं. सुनेत्रा यांच्यासह त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नावदेखील चर्चेत होतं. सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांची राज्यसभेत वर्णी लावावी, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचीदेखील त्यासाठी सहमती होती. पण ऐनवेळी छगन भुजबळ यांनी आपण देखील राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची भावना पक्षाकडे बोलून दाखवली. त्यामुळे अजित पवार हे धर्मसंकटात सापडले. याबाबत पक्षांतर्गत बरीच चर्चा, खलबतं झाली आणि अखेर सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. पण यामुळे छगन भुजबळ हे दुखावले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यांच्या नाराजीबाबत भुजबळ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आपण नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यांची देहबोली वेगळं काहीतरी सूचवू पाहत होती.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

“अरे मी नाराज वगैरे काही नाही. आता पुढे काय-काय करायचं, कारण आता बजेट येणार आहे, त्याची थोडीशी चर्चा झाली. मी बिल्कूल नाराज नाही. माझ्या तोंडावर दिसतंय का की मी नाराज आहे?”, असा उलटसवाल छगन भुजबळ यांनी केला. “तुम्हाला काय माहिती माझ्या मनात काय दु:ख आहे. तुम्ही माझ्या मनात गेले आहेत का? असं कसं होतं? पक्षात असं मागितलं जातं. कुणाला मिळतं तर कुणाला नाही मिळत. पक्षात शिस्त पाळावी लागती”, अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

‘भुजबळांना त्रास होतोय हे लपलेलं नाही’, पटोलेंचा दावा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिलीय. “छगन भुजबळ यांना त्रास होतोय, हे कुणापासून लपलेलं नाही”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चांवर पटोले यांनी टीप्पणी केली आहे. “ज्यांना अडीच वर्ष जेलमध्ये टाकलं त्यांनाच भाजपने सोबत घेतलं”, असंदेखील नाना पटोले म्हणाले. “जो ओबीसीचा चेहरा आहे त्याला टार्गेट केलं जातं हे आपण सातत्याने आतापर्यंत पाहत आलो आहोत. ओबीसी लोकांचा मतामध्ये कसा वापर करता येईल, याच्यावर भाजप काम करतंय. हेच होतंय. भुजबळांना त्रास होतोय हे लपलेलं थोडी आहे. त्यांना अडीच वर्षे जेलमध्ये टाकलं. त्याच भुजबळांना आता यांनी सोबत घेतलेलं आहे. त्यावेळेस भुजबळ डाकू होते, आता ते सन्यासी झाले आहेत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.