“आमच्यावर का हल्ले केले जातात? ग्रामपंचायतीत मतदान केलं नाही तर मारहाण करता. कशासाठी? आम्ही मतदान करायचं नाही का? ही दादागिरी कशासाठी ? दादागिरी थांबवा. तुम्ही सर्व एकत्र राहिलं तर आरक्षण टिकेल. तुम्ही कोणत्या पक्षात आहात, याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले. “मजबुतीने उभं राहा. ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देऊ नका. केवळ मतांसाठी हे करणार आहात का. मतांसाठी घाबरू नका” असं छगन भुजबल म्हणाले.
“तुम्ही 54 टक्के एक राहिला तर मुस्लिम, दलित आणि आदिवासी तुमच्यासोबत राहतील. तुम्ही आपआपसात लढत राहिला तर काहीही होणार नाही. एकत्रित या. तू मोठा, मी मोठा हा भेदभाव नाही. आपण सर्व सारखे असं समजून कामाला लागा” असं छगन भुजबळ म्हणाले. “काल जी मिटिंग झाली. त्यात जे ठरलं ते खरं आहे. कुणबी दाखले खोटे. खरे कुणबी आहेत. त्यांच्याकडे दाखले आहेत. सर्वांनाच दाखले दिले जात आहेत. ज्यांनी खोटे दाखले दिले असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. घेणाऱ्यांवर आणि देणाऱ्यांवर कारवाई होईल असं मुख्यमंत्री म्हणाले” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
आम्ही आकडा कसा सांगायचा?
“शेळ्या मेंढ्या मोजता, तर माणसांची मोजदाद का करत नाही? आमची जात गणना केली पाहिजे. काही मागितलं तर कोर्टात जाता. कोर्ट विचारतं तुम्ही किती टक्के आहात. आम्ही आकडा कसा सांगायचा? ब्रिटिशांनी गणना केली तेव्हा 54 टक्के होतो. मग आम्ही 10-12 टक्के आहोत असं कसं म्हणता? करा जातगणना. नितीश कुमारांनी जातजणगणना केली. आम्ही 65 टक्क्यावर गेलो. आम्ही जातीयवाद केला नाही. त्यांनी जातीयवाद केला” असं छगन भुजबळ म्हणाले.