राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील कार्यक्रमाचा हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत छगन भुजबळ यांच्या भाषण दरम्यान हनुमान चालीसा सुरु झाल्याचे दिसत आहेत. मग छगन भुजबळ यांनी थोडा आवाज कमी करण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे भाषण पूर्ण झाले. परंतु या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत यांनी हा मुद्दा नवनीत राणा यांच्याशी जोडला आहे. संजय राऊत म्हणाले की, अमरावतीतल्या हनुमान चालीसावाल्या ज्या बाई आहेत, त्या बाई नाशिकला पोहोचल्या पाहिजे. त्यांनी भुजबळ फॉर्मवर जाऊन हनुमान चालीसा वाचायला पाहिजे. आहे का तुमची हिम्मत? कारण भुजबळ तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ विंचूरमध्ये होते. त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी एक मंदिर होते. नेमके भुजबळ यांचे भाषण सुरु झाले अन् हनुमान चालीसा सुरू झाली. त्यावेळी व्यासपीठावर असलेला एक कार्यकर्ता भुजबळांना अभिमानाने म्हणाला, ‘बजरंगबलीसुद्धा धावून आले तुमच्यासाठी’. यावर भुजबळ म्हणाले, ‘बजरंगबलीच्या हाती सगळे आहे…’ परंतु हनुमान चालीसाच्या आवाजामुळे भुजबळांना भाषण करता येत नव्हते. त्यामुळे भुजबळ म्हणाले, ‘शक्य झाला तर थोडा आवाज कमी केला तर बरे होईल. केवळ दहा मिनिटे आवाज कमी करावा…पोलिसांना माझे सांगणे आहे. जरा पोलीस इस्पॅक्टरांनी ताबडतोब त्याची दखल घ्यावी…’
बजरंगबलीला सांगा, बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली. जरा आवाज कमी करा, मी सुद्धा बजरंगबलीचा भक्त आहे बाबा. त्यांच्याच आशीर्वादाने हे सर्व काम सुरू आहे. काय कुठे आहे मंदिर आहे. केवढा आवाज आहे’, असे भुजबळ म्हणाले. त्यानंतर हनुमान चालीसाचा आवाज कमी झाला. त्यानंतर भुजबळ यांचे भाषण झाले. भुजबळ यांनी हनुमान चालीसाचा आवाज कमी केल्यामुळे मंदिर प्रशासनाचे आभारसुद्धा मानले.
कार्यक्रमात भुजबळ यांनी विकासाचा मुद्दा मांडला. त्या म्हणाले, विकास माझी जात आहे. मी विकास कामे केले आहेत. परंतु काही लोक दिशाभूल करत आहेत. येवल्यामध्ये पैठणीची चार दुकाने होती. आज साडेचारशे झाली आहेत. बारा वळन बंधारे बांधले आहेत. डोंगरांमधून पाणी आणले आहे.