‘तुम्ही लाडक्या बहिणींना जो शब्द दिला तो तरी पाळा’, एकनाथ खडसे यांचा महायुती सरकारवर निशाणा

| Updated on: Jan 06, 2025 | 9:35 PM

एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. लाडकी बहीण योजना, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री नियुक्त्यांमधील विलंबावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया दिली.

तुम्ही लाडक्या बहिणींना जो शब्द दिला तो तरी पाळा, एकनाथ खडसे यांचा महायुती सरकारवर निशाणा
एकनाथ खडसे
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी महायुती सकारवर निशाणा साधला आहे. “निवडणुकीच्या दरम्यान सर्व मंत्र्यांनी हे वारंवार सांगितलं होतं की कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार नाही. मतदानासाठी ह्यांनी सर्व नाटक केलं. लाडक्या बहिणींना आता तपासणीसाठी बोलवण्यात येत आहे. एक वेळ पैसा दिला तर तो परत तर घेऊ नका. एक वेळ तुम्ही तो शब्द दिला आहे तो तरी पाळा”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी महायुतीवर निशाणा साधला. “उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या कन्फ्युज म्हणजेच संभ्रमावस्थेत आहेत. त्यांची अस्वस्थता ही वेगवेगळ्या शब्दांमधून बाहेर येत आहे. आता सुद्धा मतदारांना त्यांनी जे सांगितलं आहे हे त्यांच्या अस्वस्थतेतून बाहेर निघालेले शब्द आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. “आता हे सारे निवडून आलेले आहेत. त्यामुळे काम सरो आणि वैद्य मरो असं यांचं चाललंय”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यावरही खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. “निवडणुकीचे निकाल लागून जवळपास आता महिना उलटायला आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळून सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार व्हायला, खातेवाटप व्हायला उशीर झाला. पालकमंत्री नसल्यामुळे आता जिल्ह्यात डीपीडीसी नाही. एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा सरकारमध्ये आपापसात समन्वय नसल्यामुळे, एकमेकांविषयीचे विश्वासार्हता नसल्यामुळे हे प्रकार घडत आहेत. पालकमंत्री दिले तरी ते पदभार घेतील याची शक्यता नाही. कारण त्यांना मनाप्रमाणे पालकमंत्री पद पाहिजे. जनता पाहते आहे. जनतेला अपेक्षा होती की यांच्याकडून काम होईल. लाडक्या बहिणींना मदत होईल. मात्र आपण आता पाहतो आहे, निर्णय वेगळे यायला लागले आहेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

‘सुरेश धस यांचीही चौकशी झाली पाहिजे’

यावेळी खडसे यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही आरोप झाले आणि वाल्मिक कराड यांच्यावरही आरोप झाले. यामध्ये सुरेश धस यांचीही चौकशी झाली पाहिजे आणि वाल्मिक कराड यांचीही चौकशी झाली पाहिजे. मात्र यात जे दोषी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे”, असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा

“सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याबद्दल वाक्य न बोललेलं बरं. त्यांना एका दिवसामध्ये 800 कॉल आले. त्यांना जे कॉल आले त्यांनी ते कॉल रेकॉर्ड मुख्यमंत्र्यांकडे द्यावे आणि त्याची तपासणी करावी. कॉल रेकॉर्डसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं तर त्याची तपासणी होईल”, असं खडसे म्हणाले.