अक्षय मंकणी, Tv9 मराठी, मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आलाय. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. या घडामोडींदरम्यान आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आमदार अपात्रतेच्या प्रकरणी ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरुन आमदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. राहुल नार्वेकर यांनी कारवाईस विलंब केल्याने ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केलीय.
याशिवाय सुप्रीम कोर्टाने आता राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरील सुनावणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात आता विधानसभा अध्यक्षांवर दबाव वाढताना दिसत आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केलाय. त्यांचा हा दावा खरा असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा झटका असेल.
“अजित पवार गटातील 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. आमदारांची पुन्हा येण्याची इच्छा आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. “पण याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील”, असंही जयंत पाटील म्हणाले. ‘पक्ष आणि चिन्ह या संदर्भात अजित पवार गटात गोंधळ आहे”, असा दावा जयंत पाटील यांनी केला. दरम्यान, “शिरुर आणि बारामती मतदारसंघात आपल्याला खूप काम करायचं आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.
आमदार अपात्रतेच्या प्रकरणाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणात फरक आहे. शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वयाच्या 83 व्या वर्षी परिस्थितीशी लढत आहेत. निवडणूक आयोगाच्या पहिल्याच प्रत्यक्ष सुनावणीला शरद पवारांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आमदारांच्या पोटात भीतीचा गोळा येणं साहजिक आहे. याप्रकरणी काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, महाराष्ट्रात आणखी एका राजकीय भूकंपाच्या चर्चा आहेत. अजित पवार गटात शरद पवार गटातील एक बडा नेता सहभागी होणार आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या आमदारांचादेखील समावेश असल्याची चर्चा आहे. हे नेते मंत्रीपदाची शपथ घेतील तेव्हाच मंत्रिमंडळाचा आगामी विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरु आहे. या वृत्ताला मंत्री शंभुराज देसाई यांनी दुजोरा दिल्याने चर्चांना उधाण आलंय.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेण्यात आली. कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमधील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उद्या उर्वरित जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत चांगली परिस्थिती आहे. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळी नावे आली आहेत. अनेक जण इच्छुक आहेत. चर्चा करून निर्णय घेतला जाईल. फुटून गेलेल्या आमदारांपैकी अनेक जण संपर्कात आहे. परत घ्यायचं की नाही, त्याबाबत पवार साहेब निर्णय घेतील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. अनेक पक्ष महाविकास आघाडीत येऊ इच्छितात. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करू आणि जागा वाटपाचा निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.