Jayant Patil | अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, त्यावर जयंत पाटील म्हणतात…

| Updated on: Jul 23, 2023 | 10:59 AM

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर अजित पवार यांनी निधी वर्षाव केलाय त्यावर सुद्धा जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.

Jayant Patil | अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, त्यावर जयंत पाटील म्हणतात...
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट अजित पवार यांच्यासोबत, तर दुसरा गट शरद पवार यांच्यासोबत आहे. अजित पवार गटातील आमदार सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, तर शरद पवार गटातील आमदार विरोधी बाकावर बसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.

आज पत्रकारांनी जयंत पाटील यांना गाठलं. अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होत आहे तसच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर अजित पवार यांनी निधी वर्षाव केलाय. त्या संबंधी काही प्रश्न विचारले.

पुन्हा भूकंप होईल का?

राज्यात नवीन समीकरण पहायला मिळेल का? असा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांना विचारला. त्यावर त्यांनी ‘मला वाटत नाही भूकंप होईल’ असं उत्तर त्यांनी दिलं. अजित पवार यांनी त्यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर निधी वर्षाव केलाय, त्या संबंधी सुद्धा जयंत पाटील यांना प्रश्न विचारला.

राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी देण्यावर म्हणाले….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटी पेक्षा जास्त निधी दिलाय. शिंदे गटाला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न झालाय. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, “मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही वर्ष काम केलय. मला कौतुक आहे. पुरवणी मागण्या 46 हजार कोटी पर्यंत गेल्या आहेत. सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करु शकतं” “स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधी मिळतोय, याचा आनंद आहे. मतदारसंघासाठी निधी मिळत असेल, तर चांगली बाब आहे” असं जयंत पाटील म्हणाले.

विरोधी पक्ष नेत्याची निवड कधी?

विरोधी पक्ष नेत्याच्या निवडी संदर्भात म्हणाले की, “ज्यांना पक्ष मोठा आहे, त्यांनी विधानसभा अध्यक्षांना कळवलं पाहिजे. काँग्रेस पक्षातून लवकरच आज किंवा उद्या कळवलं जाईल. या आठवड्यात निवड होऊ शकते”

अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत म्हणतात….

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, ‘ते त्यांच मत आहे’. “एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. अजित पवार मुख्यमंत्री हे कोणत्या गणितात कसे होऊ शकतात, ते कळल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही” असं ते म्हणाले.