Ganpat Gaikwad Firing | “मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा. याचा मी जाहीर निषेध करते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे, हे झालच कसं? ज्याने कोणी केलं त्याला शिक्षाच झाली पाहिजे” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. “काहीही कारण असू दे फायरिंग करण्याचा अधिकार आहे ? एवढी सत्तेची मस्ती, मस्ती नाहीतर काय? गोळी कुठेही चालवू शकतो का? सर्वसामान्य माणसं पोलीस स्टेशनमध्ये असतात. हे गुंडाराज नाही तर काय आहे हे? राज्याचे गृहमंत्री काय करतायत? राज्याच्या गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“सर्वसामान्य माणसू भरडला जातोय. क्राइम वाढलाय, मी संसदेत हा मुद्दा मांडणार, 100 टक्के हा विषय देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार. आम्ही बंदुकीच्या विरोधात आहोत. बंदुक बॉर्डरवर असते. सुरक्षेसाठी पोलिसांकडे बंदुक असते, वर्दीला आपण सलाम करतो, आपण आदर्श म्हणून पाहते. त्या पोलीस स्टेशनमध्ये माहेर म्हणून जातो. लहान मुल पोलिसाला मामा बोलतात. त्या पोलीस ठाण्यात दिवसाढवळ्या कॅमेऱ्यासमोर भांडण होतात. पोलिसांसमोर गोळीबार करण्याची हिम्मत कशी होते? गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांच्या पक्षाचा माणूस आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘बॉस ही लोकशाही आहे’
“सत्तेत आहे, म्हणून कारवाई होणार नाही, बॉस ही लोकशाही आहे, अजून दडपशाही नाही. भाजपाचा आमदार असेल म्हणून त्याने काहीही करावं. उद्या हा तुम्हाल-मला गोळी मारेल. आपण काय हार घालत बसायच? देश नियम-कायद्याने चालतो, सत्तेच्या मस्तीने नाही” असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने हा गोळीबार केला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या.