राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहणी खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. “ज्यांच्या नेतृत्व त्यांनी पक्षाच्या निवडणुका लढविल्या आहे त्यांना कुठेतरी आज डावलून दुसऱ्या लोकांना संधी देण्याचे काम पक्षाने केलेलं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या पक्षासाठी जी काही भूमिका असेल ती त्यांनी मांडली. ते पक्षाचे पूर्ण नेतृत्व करत समोर गेले. ज्येष्ठ नेता म्हणून ओबीसी नेता म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे त्यांना मंत्रिपद नक्की मिळेल, असं प्रत्येकाला वाटत असताना आणि त्यांना दाबून इतरांना मंत्रीपद दिलेला आहे. कुठेतरी त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. कारण निवडणुकीमध्ये त्यांचा वापर केला आणि नंतर त्यांना मंत्रीपदापासून डावललं हे चुकीचंच आहे. तसेच माजी मंत्री अनिल पाटलांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं जळगावात नेतृत्व केलेलं आहे. तरी त्यांना मंत्रिपद दिले नाही. हा कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच आहे”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
रोहिणी खडसे यांनी यावेळी खातेवाटपावरही टीका केली. “त्यांच्या स्वतःच्या भानगडी एवढ्या चाललेल्या आहेत यांना मलिदा गॅंग असे म्हणता येईल. कुणाला कुठलं चांगलं मलिदा खाण्यासारखं खातं मिळेल यासाठी यांच्या भानगडी चाललेल्या आहे. पण मला तरी असं वाटतं की, या तीन पक्षांमध्ये सगळ्यात चांगला मलिदा खाणारा कुठला आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. यासाठीची भांडण करण्यामध्ये पक्ष व्यस्त आहे. अजून हे थोडे दिवस चालेल असं मला वाटतं”, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
यावेळी रोहिणी खडसे यांनी परभणीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “परभणीमधील घटना ही निषेधार्थ आहे. जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेसंदर्भात सरकारने योग्य ती कारवाई करावी. तेथील लोकांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि तेथील लोकांना न्याय देण्याची भूमिका लवकर त्यांनी घेणे अपेक्षित आहे. सरकार त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दाखवत आहे आणि विलंब या सगळ्या गोष्टींमध्ये होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित समाजाला असं कुठेतरी वाटत आहे की आपल्यावरती कुठे अन्याय होत आहे का? अनेक ठिकाणी त्यांची आंदोलन सुरू आहेत आणि सरकार त्यांना विश्वास द्यायला कुठेतरी कमी पडत आहे”, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.