राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक दावा केला आहे. “ईव्हीएम संदर्भात काही लोकांनी अजून काही माहिती दिली आहे. भाजपचा 88 टक्के, शिंदे गटाचा 70 टक्के, अजित पवार गटाचा 69 टक्के स्ट्राईक रेट आहे. भाजपला 10 टक्के मतं ईव्हीएमवर मिळत होती. ती सेट करण्यात आली होती. ईव्हीएममध्ये जर सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे 126 आमदार निवडून आले असते”, असा धक्कादायक दावा रोहित पवार यांनी केला आहे. “उत्तम जानकर उद्या त्यांच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहेत”, असंदेखील रोहित पवार म्हणाले.
“८८.६ टक्के स्ट्राईक रेट भाजपचा विधानसभा निवडणुकीत राहीला आहे. महायुतीचा एकत्रित ८१ टक्के स्ट्राईक रेट राहीला आहे. हा स्ट्राईक रेट लोकसभेला तीस टक्यांच्या आसपास होता. भाजपने १०० आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील ९५ निवडून आले. लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच लाभ या निवडणुकीत भाजपला झाला. भाजपचे उमेदवार होते तिथे १० टक्यांचा लाभ ईव्हीएममध्ये फेरफार करुन झाला असल्याचे दिसते. तर, अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार होते तिथे ८ टक्के फेरफार झाल्याचे दिसत आहे”, असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला.
“मोहोळमध्ये काही लोकं लॅपटॉप घेऊन मतदान केंद्रावर फिरत होते, असं सांगितलं जात आहे. ईव्हीएम मशीन आम्हाला द्यावीत. आम्ही त्यावर चौकशी करू. पाथर्डीत आमचे उमेदवार निवडून येणार, असं वाटत होतं. या ज्या शंका आहेत, त्या पालिका निवडणूका होण्याआधी दूर झाल्या पाहिजेत”, असं रोहित पवार म्हणाले. “भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार का माहिती नाही, मात्र पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे, त्या लोकनेत्या आहेत”, असंही रोहित पवार म्हणाले.
“माळशिरसमध्ये उत्तम जानकर एका गावात बॅलेट पेपरवर मतदान करणार आहेत. त्यातून सत्य बाहेर येईल. लातूर ग्रामीणमध्ये भाजप उमेदवारांना जवळपास समान मतदान झाले आहे. हा फक्त योगायोग नाही. त्यामागे काहीतरी गडबड आहे. ईव्हीम बाबतीत काँग्रेस पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. उद्धव ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असतील”, असं रोहित पवार म्हणाले.
“९ दिवस झाले, सरकार स्थापन होत नाही. एसटी महामंडळाच्या बस दरात १४ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केली जाणार आहे. योजना दुतांचे वेतन थकले आहे. या योजना दुतांनी सरकारचा प्रचार केला. लाडकी बहीण योजनेसाठी अटीशर्ती टाकण्याची भाजपची तयारी सुरु झाली आहे”, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
“रोहीत पाटील यांना मुख्य प्रतोदपदी नियुक्ती देण्याची मीच शिफारस केली होती. मीच तो प्रस्ताव मांडला होता. आमच्या सर्वांची त्याला संमती आहे. आमच्याकडे एकतर नेते राहीलेले नाही. मुख्य प्रतोद महत्वाचे पद आहे. नवख्या व्यक्तीला पद दिले तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करु. पक्ष भविष्यात मला योग्य पद देईल”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. यावेळी रोहित पवार यांना आमदार अमोल मिटकरी यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. “अमोल मिटकरी चंगुमंगु, त्यांच्यावर उत्तर देणार नाही. टीव्हीवर येणासाठी ते माझ्यावर बोलतात”, अशी टीका रोहित पवारांनी केली.
“एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगले काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत बदल करण्याची वेळ आली आहे. शरद पवार आणि जयंत पाटील ते बदल लवकरच करतील,” अशी माहिती रोहित पवारांनी दिली. “अजित पवार आणि एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष पद भाजपकडे जाऊ देणार नाहीत. शिवसेनेकडे गृहमंत्री पद मिळालं नाही म्हणून तेव्हा सरकार वाचलं नाही. असं मला वाटत नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा आमदारांवर विश्वास होता. शिंदेवर विश्वास होता”, असं रोहित पवार म्हणाले.
“कोर्टाच्या भरतीत कंत्राटी भरती करणार, असं समजतंय. त्याला आमचा विरोध असणार आहे. लाडकी बहीण योजनेत काही अटी शर्थी टाकल्या जाणार, 2100 रुपये दिले जाणार का? यावर शंका आहे. आम्ही अधिवेशनाची वाट बघत आहोत”, असं रोहित पवार म्हणाले. “हे सरकार सर्वांना लाभ देईल असं वाटत नाही. बऱ्याच महिला यामध्ये बाद होतील. काही योजना अशा आहेत, निवडणूकांच्या आधी घोषणा केल्यात. मात्र नंतर त्या बंद झाल्यात. आता लाडकी बहीण योजनेचे काय होतं ते बघूया”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.