शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण त्यांच्या आवहनानंतर मुंबई हायकोर्टात या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तातडीने आज सुनावणीदेखील झाली. मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारला तसं झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून शरद पवारांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र बंद कदाचित मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.
“बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालय यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 23, 2024
दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांना उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या एक दिवस आगोदर पोलिसांकडून नोटीस जारी झाली आहे. याप्रमाणे मुंबईत अनेक नेत्यांना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना स्थानिक पोलीस ठाण्याकडून नोटीस जारी झाल्याची माहिती मिळत आहे.
“सर्वांना सांगतो उद्या दुपारी २ वाजेपर्यंत बंद कडकडीत पाळा. सरकारच्या कारभारावर चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवून द्या. काही पेपरमध्ये बातम्या आल्या आहेत. शाळेतील मुख्याध्यापिकेने प्रश्न केला की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील. कोर्टानेही काल बदलापूर प्रकरणावर ताशेरे ओढले आहेत. रोज घटना घडत आहे. १३ ऑगस्टला बदलापूर,. १५ पुणे, २० ऑगस्ट लातूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये या घटना घडल्या आहेत. सरकारला आरसा दाखवत आहे. एवढं सर्व चालू असताना एवढं निर्ढावलेपणे बहिणीची किंमत पैशात करत असाल तर बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. बहिणीचं रक्षण करा. सुरक्षित बहीण फार महत्त्वाचं आहे. बातम्या वाचून संतापाचा कडेलोट होतोय”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मांडली.