मुंबई : “अजित पवार आमचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी केलं. त्यानंतर अजित पवारांना दार बंद आहेत, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी अशी परस्परविरोधी विधान केली. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं. “एक लक्षात घ्या शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. इंडिया आघाडीत देशातील प्रमुख राजकीय पक्षाचा हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात गट निर्माण झालाय. त्या गटाचे शरद पवार प्रमुख घटक आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
“या महाराष्ट्रात वैचारिक लढा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली की, नाही हे जनता ठरवेल. माझ्या माहितीप्रमाणे फूट पडलेली आहे. जसा शिवसेनेतून फुटून एक गट वेगळा झाला. पक्षाची भूमिका, पक्षप्रमुखांचा विचार बाजूला ठेवला. भाजपा बरोबर हातमिळवणी केली. हा पक्षद्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
‘याला फूट म्हणायच नाहीतर काय?’
“त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटला. पक्षाच्या विचारधारेविरोधात जाऊन भाजपाशी हातमिळवणी केली. अजित पवारांसह प्रमुख नेत्यांची हकालपट्टी केली. याला फूट म्हणायच नाहीतर काय? अजित पवार गटाने शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली, याला आम्ही फूट मानतो” असं संजय राऊत म्हणाले.
‘आम्ही तटकरे किंवा अजित पवार यांच्याशी बोलत नाही’
“लोकांमध्ये संभ्रम नाही. राष्ट्रवादीत फूट पडलीय, हे लोकांनी ठरवलय. एका गटाने ईडीच्या भीतीने भाजपाबरोबर हातमिळवणी केली. शरद पवार यांना मानणारा एका मोठा वर्ग महाविकास आघाडीसोबत आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला. “आम्ही ठरवलय महाराष्ट्रात, देशपातळीवर भाजपाचा पराभव करायचा आहे. आम्ही जयंत पाटील, शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीबद्दल चर्चा करतो. आम्ही तटकरे किंवा अजित पवार यांच्याशी बोलत नाही” असं संजय राऊत म्हणाले.
‘त्यांना भाजपाचा विचार मान्य नाही’
“शरद पवार यांचा दोन दगडांवर पाय नाही. ते भाजपासोबत जाणार नाहीत. ती त्यांची वैचारिक भूमिका कधीच नव्हती. शरद पवार यशवंतराव चव्हाण यांना गुरुस्थानी मानतात. त्यांना भाजपाचा विचार मान्य नाही” असं संजय राऊत यांनी सांगितलं.