‘या’ दोन वक्तव्यांवरुन समजतंय, राष्ट्रवादीत पुढचा वाद, राष्ट्रीय अध्यक्ष कोण?

| Updated on: Aug 26, 2023 | 7:05 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून येण्याची चिन्हं आहेत. कारण दोन्ही बाजूंकडून याबाबत मोठे वक्तव्ये करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी याबाबतचे वक्तव्ये केले आहेत.

या दोन वक्तव्यांवरुन समजतंय, राष्ट्रवादीत पुढचा वाद, राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
Follow us on

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांना सर्वाधिक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तसेच पक्षाच्या आठ बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर दोन्ही गटाचा हा वाद आता निवडणूक आयोगात जावून पोहोचला आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा केला जातोय. अजित पवार यांच्या गटाने तर त्यांचा राष्ट्रीय अध्यक्षदेखील ठरवला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार यांच्या गटाचे नेते सत्तेत सहभागी झाले तेव्हा शरद पवार हे आमचे नेते आहेत, असं म्हणत होते. अजित पवार यांच्या गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बॅनर्सवर सर्रासपणे शरद पवार यांचा फोटो वापरला जात होता. शरद पवार यांनी विरोध करुनही त्यांचा फोटो वापरला जात होता.

याशिवाय अजित पवार आणि पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनी शरद पवार यांची दोनवेळा प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्यासोबत सत्तेत या, अशी विनंती केल्याची घटना देखील घडली. पण त्यानंतर आता अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नसून अजित पवार हेच ठरवलं आहे. त्यामुळे आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? या वरुन नवा वाद उफाळून येण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे शरद पवार यांनी आपणच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्यामुळे पक्षाचं धोरण राबवण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवू. निवडणूक आयोगाकडे आम्ही याचिका दाखल केलीय, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

“उद्या निवडणुका अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळच्या चिन्हावर लढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब मिळेल, असा विश्वास आहे. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ आणि मी आमच्या उपस्थितीत 3 जुलैला सह्याद्री अतिथीगृहाला जी बैठक झाली, त्या बैठकीत आम्ही भूमिका स्पष्ट केली. अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, असं आम्ही आमच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय द्यायचा असेल तो निवडणूक आयोगाकडून मिळेल”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.