पूजा आत्महत्या प्रकरणात मंत्री राठोडांचं नाव येताच राष्ट्रवादी म्हणते, कुणालाही वाचवलं जाणार नाही!

| Updated on: Feb 12, 2021 | 9:09 PM

चित्रा वाघ यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे (Vidya Chavan on Chitra Wagh Allegations)

पूजा आत्महत्या प्रकरणात मंत्री राठोडांचं नाव येताच राष्ट्रवादी म्हणते, कुणालाही वाचवलं जाणार नाही!
Follow us on

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी थेट शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. त्यांच्या मुसक्या आवळाव्या, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी घणाघात केला आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. संजय राठोड यांच्यावर भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी भूमिका काय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही विद्या चव्हाण यांच्याशी बातचित केली. यावेळी त्यांनी कुणालाही वाचवलं जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. याशिवाय त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (Vidya Chavan on Chitra Wagh Allegations).

विद्या चव्हाण नेमकं काय म्हणाल्या ?

भाजपच्या प्रवक्त्यांना उठसूट कोणावरही आरोप करण्याची सवय झाली आहे. भाजपच्या सर्वच नेत्यांना अशाप्रकारची सवय झाली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. पूजा चव्हाण या तरुणीने अशाप्रकारे आत्महत्या केली असेल किंवा फोनवर अशाप्रकारचे पुरावे सापडले असतील तर निश्चितच चौकशी केली जाईल. कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न कुणीही करणार नाही. कारण अशा प्रकारच्या संबंधित मुलीच्या फोनमध्ये असे काही पुरावे असतील तर चौकशी होईल (Vidya Chavan on Chitra Wagh Allegations).

यासाठी व्यवस्थित यंत्रणा आहे. चौकशीनंतर आपण निष्कर्षात जाऊ शकतो. मंत्री असतील तर त्यांचं नाव घेणं योग्य नाही. धनंजय मुंडे यांच्यावरही असे आरोप झाले. मात्र, त्याचं काय झालं ते आपण सगळ्यांनी बघितलं.

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, पुरावे काय, ते प्रकरण काय, त्याची शाहनिशा झाल्याशिवाय एखाद्या व्यक्तीवर अशाप्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही स्वत:च न्यायाधीश बनलात तर कोर्टाचा काय उपयोग? तुम्ही स्वत:च संबंधित व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार, हे बरोबर नाही. त्यामुळे आधी त्याची सविस्तर चौकशी होईल. संपूर्ण पोलीस यंत्रणा निश्चितच तपास करेल. तोपर्यंत धीड धरायला काय हरकत आहे?

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या क्वारंटाईन आहेत. ते प्रत्येक प्रकरणाकडे गांभीर्याने बघत आहेत. याप्रकरणाची निश्चितच चौकशी होईल. मी स्वत: त्यांच्याशी याबाबत बोलेल. कुणावरही बिनबुडाचे आरोप करायचे, हे बरोबर नाही.

जर अजूनपर्यंत तक्रार झाली नसेल तर निश्चितच पोलीस यंत्रणा चौकशी करेल. कारण प्रत्येक आत्महत्येमागे कुठलं कारण आहे हे शोधून काढणं हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे. ते निश्चितच तसं करतील. याप्रकरणी मी स्वत: आढावा घेईन.

मुलीचे नातेवाईकांकडे संभाषण असेल. दाभोळकरांची मागे हत्या झाली होती त्याआधी आमचं फोनवर संभाषण झालं होतं. त्यावेळी मलाही विचारलं होतं. असे अनेक लोक फोन करतात. तर प्रत्येकाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहात का?

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा : चित्रा वाघ

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात भाजप आक्रमक; संजय राठोड नॉट रिचेबल