Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ पक्षात नाराज आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे उघडपणे ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. त्यानंतरही त्यांच्या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. दरम्यान पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट झाली का? त्यावर छगन भुजबळ यांनी थेट उत्तर दिले. त्यांनी या भेटीचा इन्कार केला. तसेच उद्विग्न होऊन त्यांनी आता माझ्या सर्व भावना मेल्या असल्याचे म्हटले आहे.
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही. मला या मुद्द्यावर आता काहीच बोलायचे नाही. आता माझ्या सर्व भावना मेल्या आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळ यांचे खूप लाड झाले आहेत, तरीही ते नाराज का असतात? असे विधान दोन दिवसांपूर्वी केले.
त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले म्हणाले, माणिकराव कोकाटे यांना सांगायचे आहे की, मी राष्ट्रवादीचा संस्थापक सदस्य आहे. पवारसाहेबांसोबत झेंडा, पक्षाचे नाव, घटना काय असावी हे माझ्यासमोर ठरले. कोकाटे मात्र उपरे आहेत. पाच वर्षापूर्वी ते पक्षात नव्हते. पाच वर्षापूर्वी त्यांनी माणसे पाठवली. मी पवारांना विचारले. त्यावेळी ते नाही म्हणाले. त्यानंतर आम्ही पवारांना समजावले. तेव्हा त्यांनी सांगितले तुम्हाला काय करायचे ते करा. त्यानंतर मी कोकाटे यांच्या प्रचाराला गेलो. आता मी संस्थापक सदस्य आहे. त्यामुळे माझा पक्ष आणि मी काय करायचे ते पाहू घेऊ. कोकाटे यांना कोणी बोलायला सांगत नाही.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एकाच मंचावर आलेले होते. शरद पवार यांनी त्या कार्यक्रमात एक कागदावर संदेश लिहिला. लिहिणे झाल्यानंतर तो कागद त्यांनी बाजूला ठेवला. ज्यानंतर त्यांच्या शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांनी हा कागद वाचला. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली.
मग दोन्ही नेते हसूही लागले होते. त्या चिठ्ठीत काय होते? याबद्दल राज्यातील राजकारणात उत्सुक्ता आहे. त्यावर भुजबळ यांनी सोमवारी बोलताना मोजक्या शब्दात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, शरद पवार यांनी त्या दिवशी कार्यक्रमात चिठ्ठी दिली. त्यावर काय लिहिले ते सांगू? त्यावर लिहिले ‘परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ’ (भुजबळ मनसोक्त हसले). मी सांगितले ना. उत्तर दिले ना आता, अशी गुगली भुजबळ यांनी पत्रकारांची घेतली.