‘गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही’, धनंजय मुंडे का संतापले?

| Updated on: Sep 09, 2024 | 7:44 PM

मंत्री धनंजय मुंडे यांनी 'सामना'मधील अग्रलेखावर टीका केली आहे. गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत ठाकरे गटाला पूर्णपणे पाण्यामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही, धनंजय मुंडे का संतापले?
धनंजय मुंडे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखात आज दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अग्रलेखात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना गोपीनाथ मुंडे यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन कृषीमंत्री धनंजय मुंडे चांगलेच संतापले आहेत. धनंजय मुंडे यांनी या अग्रलेखावरुन ठाकरे गटावर निशाणा साधला.

मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘सामना’मधील अग्रलेखावर टीका केली. गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच संजय राऊत ठाकरे गटाला पूर्णपणे पाण्यामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या टीकेवर आता संजय राऊत यांच्याकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी या विषयावर राजकारण तापण्याची शक्यता आहे.

‘सामना’मध्ये नेमकं काय म्हटलंय?

“देवेंद्र फडणवीस यांनीही तेच केलं आणि आता महायुतीत तोच पाडापाडीचा खेळ होणार हे निश्चित आहे. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण शिवसेना आमदारांचा आकडा कमी कसा होईल, यास खतपाणी घालणारे होते. स्वत:च्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चेहऱ्याची उठाठेव करणे फडणवीस यांनी थांबवायला हवे”, असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची अशाप्रकारे बदनामी करणं हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरेंनी आता तरी संजय राऊत यांचा सहवास कमी करावा. संजय राऊत हे ठाकरे गट पूर्णपणे पाण्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात. गोपीनाथ मुंडे आज हयात नसताना अशा प्रकारचं वक्तव्य करतात, लाज वाटली पाहिजे हे आमच्यासाठी अतिशय वेदना देणारं आहे”, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.