मुंबई : “सर्वपक्ष दादांसोबत आहे. आमचा पक्ष फुटीर नाही. आमचा पक्ष फुटलेला नाही. शरद पवार आमचे आदर्श आहेत. शरद पवार, अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस” असं राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं. अमोल मिटकरी हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. काल जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली. त्यात व्हिप कोणाचा लागू होणार? मुख्य प्रतोद कोण? असे प्रश्न मिटकरींना विचारण्यात आले.
त्यावर त्यांनी रात्री 11 नंतर झालेली पत्रकार परिषद मी पाहिलेली नाही, असं उत्तर दिलं. ‘सर्व आमदार इथे आहेत. काही आमदार वाटेवर आहेत’ असं अमोल मिटकरी म्हणाले. नऊ आमदारांनी शपथ घेतली म्हणून ते पक्ष नाहीत, या जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, ‘मी, ती पत्रकार परिषद पाहिलेली नाही’ असं उत्तर मिटकरींनी दिलं.
राष्ट्रवादीच्या उतावीळ कार्यकर्त्यांना समज
अजित पवारांसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या फोटोला काळ फासण्यात आलं. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर मिटकरी म्हणाले की, “काही कार्यकर्ते उतावीळ असतात, नारेबाजी करतात, काळ फासतात. जितेंद्र आव्हाड यांनी फोटोला लागलेलं काळ पुसलं ही दुसरी बाजू आहे. उतावीळ कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा अपमान करु नय़े. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पक्षात असे उतावीळ कार्यकर्ते असतात”
‘मी आरएसएसचा टोकाचा विरोधक’
हिंदुत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मिटकरी म्हणाले की, “भाजपाच हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व इतरांच हिंदुत्व नाही का?” भाजपाच हिंदुत्व बेगडी असल्याच ते म्हणाले. “मी आरएसएसचा टोकाचा विरोधक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाच्या विरोधात होते. पण ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत सरकारमध्ये होते. पण त्यांचा आरएसएसला विरोध कायम होता. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या चळवळीतील कार्यकर्ते आहोत. आम्ही तडजोड करणार नाही” असं मिटकरी यांनी स्पष्ट केलं.
पांडुरंगाला का घातलं साकडं?
“महाराष्ट्राला आज अजित पवारांसारख्या चांगल्या प्रशासकाची गरज होती. त्यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून मी पांडुरंगाला साकड घातलं आहे” असं अमोल मिटकरी म्हणाले.