राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे लोकसभा निवडणूक जिंकताच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी मेगाप्लॅन तयार केल्याची देखील माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात एकूण 10 जागांवर निवडणूक लढवली. यापैकी 8 जागांवर शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला. विशेष म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा त्यांची थोडक्यात गेली. अन्यथा 10 पैकी 9 जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय पक्का होता. साताऱ्याची जागा हातून निसटली असली तरी शरद पवार यांचा पक्षाचा लोकसभा निवडणुकीतला स्ट्राईक रेट हा चांगला आहे. शरद पवार गटाला घवघवीत यश मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीनंतर पुढच्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पराभव झाला तर आमदारांना पुढचे पाच वर्षे घरी बसावं लागू शकतं. त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील किती आमदार आपल्या संपर्कात आहेत, याबाबतचा आकडाच सांगितला आहे. याशिवाय हे आमदार पुढच्या 15 दिवसात अजित पवार गटात सहभागी होतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 30 उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांनी उमेदवार निश्चित केले आहेत, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या मंत्र्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. हे मंत्री आगामी काळात शरद पवारांना शरण येतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण रोहित पवार यांनी केलेला दावा मोठा आहे. या दाव्यानुसार घडामोडी घडल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे.
अजित पवार आणि त्यांचे मंत्री जेव्हा परत येण्याचा विचार करतील तेव्हा आम्ही शरद पवारांपुढे आमची भूमिका मांडू, तेव्हा आमची भूमिका फार वेगळी असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी आताच 30 उमेदवार नक्कीच केले आहेत. अजित पवार गटाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार फायनल झाले आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांचा हा दावा अजित पवारांच्या मंत्र्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
अजित पवार गटातील 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या 15 दिवसात दिसेल, असंदेखील भाकीत रोहित पवारांनी व्यक्त केलं. “आमच्यातील काही लोकं रात्री-बेरात्री जाऊन महायुतीच्या नेत्यांशी सेटिंग करत होते त्यांचे नावं लवकरच जाहीर करणार आहोत. अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात येणार हे येत्या 15 दिवसात दिसणार नाही, पुढच्या 15 दिवसात त्यांना निर्णय घ्यावे लागणार”, असं मोठं वक्तव्य रोहित पवारांनी केलं.