पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी अढळराव पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. रविवारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यावेळी ते अजित पवार यांच्याासोतब जाणार असं दिसलं होतं.
पण दुसऱ्यादिवशी अमोल कोल्हे यांनी यू-टर्न घेतला व आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याच स्पष्ट केलं. अमोल कोल्हे यांच्या यू-टर्नमुळे सर्वांनाच राजकीय धक्का बसला होता.
अमोल कोल्हेंनी सांगितला दोघांमधला फरक
आता खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजी अढळराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “शिवाजी अढळराव पाटील यांना चार वेळा लोकसभेची संधी देऊनही, अढळराव पाटील यांनी स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.राष्ट्रवादी काँग्रेसने मला एकदाच उमेदवारी दिली आणि शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात मी त्याच्या सोबत ठामपणे उभा आहे. हा अढळराव आणि माझ्यामधील मूलभूत फरक आहे” असं वक्तव्य शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं.
‘तुमच्या छंदा बाबत तशी परिस्थिती आहे का?’
“अभिनय हे माझ्या चरितार्थाच साधन आहे. अढळराव यांच्यासारखी माझी अमेरिकेत कोणतीही कंपनी नाही, हे मतदार संघातील मतदारांना माहिती आहे” अशी खोचक टीका कोल्हे यांनी केली आहे. “अभिनय हा माझा छंद आहे आणि माझे छंद चार चौघात उजळ माथ्याने सांगू शकतो, तशी परिस्थिती तुमच्या छंदा बाबत आहे का? “असा अडचणीचा प्रश्न त्यांनी अढळराव यांना विचारला आहे.
‘करारा जबाब मिलेगा’
“विकास कामे काय केली, याबाबत आपण वार, तारीख, पुरावे यानुसार बोलू. करारा जबाब मिलेगा” असं विधान कोल्हे यांनी केलं आहे. “शिवाजी अढळराव पाटील हे मीडियाला एक बोलून, पाठीमागून अडून-लपवून शरद पवार यांना भेटण्यासाठी जी दारे थोटावत आहेत, त्याची किल्ली माझ्याकडे आहे” असा खुलासा डॉ अमोल कोल्हे यांनी केला.