नवी दिल्ली | 24 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे खासदार सुनील तटकरे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दाखल झाले. ते निवडणूक आयोगाबाहेर दाखल झाले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अविश्वासाच्या ठरावावेळी अजित पवार गटाच्या आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता सुनील तटकरे यांनी त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबाबत भाष्य केलंय. मतदानाचा व्हीप बजावण्यावेळी पडद्यामागे काही घडामोडी घडल्या होत्या, असा दावा सुनील तटकरे यांनी केलाय.
“मी सुप्रिया सुळे यांचं कालचं स्टेटमेंट पाहिलं. नरेंद्र मोदी सरकारवर अविश्वासाचा ठरावावर लोकसभेत चर्चा झाली होती. खरंतर मी आज सर्व गोष्टी उघड करणार नाही. पण व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या. त्या मलाही ज्ञात आहेत. कदाचित जयंत पाटील यांच्याशी आपल्यापैकी कुणी संपर्क केला नाही. जयंत पाटील यांनी त्या चर्चचं विश्लेषण केलं तर ठीक राहील. नाहीतर काळ्या चौकामध्ये मी सुद्धा बोलेन”, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला.
“दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती अविश्वास प्रस्तावावर होती. ज्यावेळेला अविश्वासाच्या ठरावावर मतदानाची वेळ आली त्यावेळी प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली नाही”, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. “आम्ही एनडीएत सहभागी झालो असल्यामुळे सरकारच्या विरोधात ज्यावेळेला प्रस्ताव येतो, त्यावेळेला आम्ही सरकारच्या बाजूने असल्यामुळे सरकारच्या बाजूनेच मतदान केलं असतं हे स्पष्ट आहे. त्यात दुमत नाही. निर्भया प्रकरण झाल्यानंतर मनमोहन सिंह सरकारवर ज्यावेळी अविश्वासाचा प्रस्ताव आला होता त्यावेळी सरकार पक्षामध्ये असताना खासदारांनी कोणाच्या बाजूने मतदान केल्या होत्या?”, असा सवाल सुनील तटकरे यांनी केला.
“केवळ टीका कराव्यात यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी बोलल्या जातात. दुसरी गोष्ट सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिला आरक्षणाच्या विधेयकाचा वेळेला मी मतदान केलं नाही. खरं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण पूर्णपणे ऐकलं. मी वारंवार सांगितलंय की, गणेशोत्सवाचा पहिला दिवस होता, त्यामुळे मला जाणं आवश्यक होतं. लोकसभेचे 542 सदस्य होते. मतदानात सहभागी झालेल्या सदस्यांची संख्या 480 होती. त्यामुळे उरलेले सगळे महिला विरोधी आहेत, असं सातत्याने म्हणणं चूक आहे”, असं प्रत्युत्तर सुनील तटकरे यांनी दिलं.
“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यावर असे आरोप केले जातात, त्यावेळेला अशी स्थिती निर्माण झालेली बघायला मिळते”, असा टोला सुनील तटकरेंनी लगावला. “आम्ही 5 जुलैला राज्यव्यापी शिबिरआ बोलावलं होतं त्यावेळी अजित पवारांनी विस्तृतपणे भूमिका मांडली होती. आता आमचं 30 आणि 1 तारखेला राज्यव्यापी शिबिर आहे. त्यावेळी स्पष्टपणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल”, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.