पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागच्या आठवड्यात भेट झाली. व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील बंगल्यात ही भेट झाली होती. त्यावरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रणीत इंडियामधील घटक पक्षांमध्ये शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाने या बद्दल आपली चिंता व्यक्त केली. आज कोल्हापूर येथे ध्वजा रोहणासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलं.
आज शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या भेटीवर भाष्य केलं. त्यामुळे आता तरी या भेटीवरुन उडालेला धुरळा शांत होईल, अशी अपेक्षा आहे.
सुप्रिया सुळे भेटीवर काय म्हणाल्या?
नात्यांमधला ओलावा आणि राजकीय धोरण यांच्यात कोणी गल्लत करु नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात वाद होतात, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, “राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच ऐकमेकांशी भांडण झालेलं नाही. गैरसमज नसावे” “मी स्वत: काँग्रेस आणि शिवसेनेशी बोलली आहे. त्यामुळे इतरांनी कोणी चिंता करु नये. सांगोल्यातली पवारसाहेबांची सभा आणि प्रेस बघितली असेल, तर मला संभ्रमाची स्थिती वाटत नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘पुण्याच्या बैठकीच मनावर घेऊ नका’
“पुण्याच्या बैठकीच मनावर घेऊ नका. शरद पवार हे पवार कुटुंबातील ज्येष्ठ वडिलधारी व्यक्ती आहेत. मी त्यांचा पुतण्या आहे. हे मीडियावाले अशा भेटीला प्रसिद्धी देतात. त्यातून समज-गैरसमज निर्माण होतात. फार तिथे काही वेगळं घडलं असं समजू नका” असं अजित पवार म्हणाले. “जनतेला सांगेन, यापुढे केव्हाही भेटलो तर त्यातून कुठलाही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते मी लपून गेलेलो नाही, मी उजळ माथ्याने फिरणारा आहे” असं अजित पवार म्हणाले.