राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढाई कठीण असणार आहे.
शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेहबूब शेख, राणी लंके, भाग्यश्री आत्राम, रोहित पाटील अशा नावांचा समावेश आहे. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील, सररजित घाटगे, उदगीरचे सुधाकर भालेकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हे तीनही नेते भाजपमधून शरद पवार गटात आले आहेत. तसेच खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमधून आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.