राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शाह यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. अमित शाह यांच्या या दौऱ्यात त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचीदेखील चर्चा आहे. असं असताना जयंत पाटील यांनी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला. “अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. त्या दोघांमधे अंतर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनासारखं महाराष्ट्रात काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची पंचायत आहे. बाकी दोघे सत्तेसाठीच गेले आहेत. जनतेने अमान्य केलेलं हे त्रिकुट आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
“राजकीय लोकांची विश्वासहार्यता वाढवणं गरजेचं आहे. कारण सध्या महाराष्ट्रातील राजकारण ज्याप्रकारे ढवळून निघालं आहे, त्याचे खोल परिणाम होताना दिसतात, ज्यात महाराष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम होतो. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. त्यापुढे 17 ते 18 कोटी वाढली तर ठीक. पण त्यापेक्षा जास्त जावू न देणं, आणि स्वतःच्या राज्याची प्रगती करायची असेल तर मराठी शिक्षणाचा दर्जा सुधारणं गरजेचं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“शेतकऱ्याची कहाणी वेगळी आहे. त्यांना दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर योग्य मोबदला मिळणं, तसेच त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला तर शेतकरी पर्याय न शोधता शेती करतील, असे नियोजन करणे गरजेचं आहे. सामाजिक दरी, वाहतूक आणि रस्ते, पाणी हे महत्त्वाचे विषय आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
“लाडकी बहीण योजना स्तुत्य आहे. पण ज्यांना खरंच गरज आहे अशाच महिलांना मदत मिळणं गरजेचं आहे. निवडणूक समोर ठेवून असं करणं चुकीचं आहे. ज्यांना गरज आहे त्यांना पैसे वाढवून द्यावेत. सध्याचे राजकारण ज्याप्रकारे सूरू आहे, त्यामूळे अनेक योजना येतात आणि निवडणूक नंतर ते बंद होतात. त्यामूळे या प्रकारच्या योजना नंतर टिकत नसतात”, असा मोठा दावा जयंत पाटील यांनी केला.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनातलं कळतं पण मी बोलत नाही. शरद पवारांच्या आजच्या भूमिकेमुळे आघाडीची बिघाडी होत नाही. त्यामूळे ते थोडी माघार घेतात, आणि जागा कमी आल्या तरी आघाडी एकत्रित राहणं गरजेचं ही त्यांची त्यागाची भूमिका आहे. शरद पवारांना सगळ्यांना एकसंघ ठेवण्यात रस आहे. त्यांची आघाडीतील भूमिका महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच ते नेहमीच त्यागाच्या भूमिकेत राहीले आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.