बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वत: पोलिसांना सरेंडर झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास असल्याचं म्हटलं. “मी सभागृहातही बोललोय. जे चांगला आहे ते चांगलं आहे. ते स्वीकरतो. पण न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही. पण आम्हाला अपेक्षा आहे की, ते न्याय करतील. आतासुद्धा जाताना मुख्यमंत्री बोलून गेले की, ते एकालाही सोडणार नाहीत. फक्त माझी मागणी त्यापुढे आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्याबरोबरच परभणीचे स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांनादेखील न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. ती इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर गोष्ट वेगळी आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
“सिव्हिल हॉस्पिटलला शेवटचा फोन कुणाचा गेला, हे सर्वांना माहिती आहे. माझ्याच तोंडातून कशाला ऐकता? याआधी देखील बापू अंधारे मर्डर प्रकरण मी आणि जयंत पाटील, आम्ही लावून धरलं होतं. पण तेव्हा जे एसपी होते ते ऐकत नव्हते. सत्तेमध्ये नसलं की काय असतं ते आम्ही बघितलं आहे. सत्तेत होतो तेव्हा क्राईम घडला नव्हता. मागच्या पाच वर्षात जेवढे खून झाले त्या सर्व खूनांचा तपास करा. मृतकांच्या घरच्यांना बोलवा आणि त्यांना विचारा की, कुणावर तुमचा संशय होता. अनेक जण सांगितली की, कुणावर संशय आहे. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बाबाचं पत्र आहे की, माझ्या पोराला बुडवून मारलं. आम्ही ज्युडीशीयल इन्कावयरी का मागतोय? कारण त्यामध्ये तुम्ही जावून जस्टीसला भेटू शकता आणि सांगू शकता की, माझी अशी तक्रार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल, असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी विषयी सांगितलं होतं. आज ते ज्या पद्धतीने बोलले आहेत अपेक्षा आहे की, ते त्याच पद्धतीने कारवाई करतील. मुख्यमंत्र्यांकडे मला खूप काही अपेक्षा आहेत. मुख्यमंत्र्यांची 2014 ची भाषणाची स्टाईल ही झुकून बोलायचे. पण आता ते न झुकता उभे राहून बोलतात. त्यांची बॉडी लँग्वेज बदलली आहे. त्यामुळे ते कोणत्याही गुन्हेगाराला माफ करतील, असं मला वाटत नाही”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
“मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं. वाल्मिक कराड ताब्यात आला. पण आका अजून बाहेरच आहे. जसं मी सांगितलं की, महाराष्ट्राचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा आरोप होतो आणि तपास पुढे जातो तेव्हा संबंधित मंत्री खुर्चीवरुन बाजूला होतो. जस्टिन लँटिनची केस तपासा. जुनं प्रकरण आहे. पण तपासून बघा”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.