अजित पवार गटाचं टेन्शन वाढणारी बातमी, सुप्रिया सुळे यांचा ‘त्या’ वृत्ताला दुजोरा

| Updated on: Jun 07, 2024 | 8:26 PM

इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे . "आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आता आमच्याकडे अपेक्षित नंबर नाहीत. पण आम्ही प्रचंड आशावादी आहोत. संपूर्ण देशात आमच्या मित्रपक्षांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिला", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

अजित पवार गटाचं टेन्शन वाढणारी बातमी, सुप्रिया सुळे यांचा त्या वृत्ताला दुजोरा
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा फोटो
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी दुजोरा दिला आहे. अजित पवार गटाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असून पुढच्या 15 दिवसांत अनेक जणांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. याबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अनिल देशमुख यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. “अनिल देशमुख हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सत्य असल्याशिवाय ते विधान करणार नाहीत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नक्की येणार आहे. कारण 200 आमदार असतानाही राज्यात काय परिस्थिती आहे? दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे कंबरडं मोडण्याचं काम ह्यांनी केलंय. कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळ नीट हाताळला नाही. बेरोजगारी महागाई प्रचंड वाढती आहे. येणाऱ्या विधानसभेनंतर बारामती मतदारसंघांमध्ये अनेक मंत्री होऊ शकतात”, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

‘टर्निंग पॉईंट त्या सभेनंतर सुरू झाला आणि…’

खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यासोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “थोपटे साहेबांचा आशीर्वाद मी प्रत्येक इलेक्शनच्या आधी आणि नंतर घेत असते. मी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे आभार मानते. त्यांनी या सगळ्या काळात प्रचंड साथ दिली. भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यात सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी मेहनत घेतलीच, पण त्यांच्या पत्नी स्वरूपा वहिनींची मेहनत जास्त आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“बारामती मतदारसंघातली पहिली सभा संग्राम थोपटे यांनी भोरमध्ये घेतली. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात मोहोल तयार झाला. प्रचंड गर्दी सभेला झाली. टर्निंग पॉईंट त्या सभेनंतर सुरू झाला आणि तिथून सुरू झालेला माहोल शेवटपर्यंत राहिला”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

निवडून आल्यानंतर आता पहिलं काम काय करणार?

खासदार म्हणून निवडून आल्यावर आता पहिलं काम काय करणार? या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. “भोर विधानसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयटी पार्क आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात ते झालेलं आहे. त्या ठिकाणी सहा लाख लोकांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जॉब मिळाले आहेत. तिथल्या 35 ते 40 कंपन्या दुसऱ्या राज्यात चालल्या आहेत. त्या थांबवा ही माझी त्यांना विनंती राहणार आहे. कारण या सरकारने त्यांना हवी तशी मदत केलेली नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

“नवीन कंपन्या आणायचं या सरकारला जमलं नाही. पण आहेत त्या पण हे टिकवू शकले नाहीत. हिंजवडी आयटी पार्कच्या कंपन्या या ठिकाणी कशा राहतील? यासाठी संग्राम थोपटे आणि मी प्रयत्न करणार आहोत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार?

इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार का? या प्रश्नाचं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे . “आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आता आमच्याकडे अपेक्षित नंबर नाहीत. पण आम्ही प्रचंड आशावादी आहोत. संपूर्ण देशात आमच्या मित्रपक्षांचा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिला. माझ्यावर लोकांनी जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझी जबाबदारी वाढलेली आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.