‘पोरगी चांगली स्मार्ट पाहिजे, एक नंबर देखणी असेल तर…’, आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Oct 02, 2024 | 6:18 PM

देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. "अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं", असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. "महिलांचा अपमान करणं चुकीचं आहे. अशा आमदारांना लाज वाटली पाहिजे. महिलांचं वर्गीकरण करणं चुकीचं आहे", असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

पोरगी चांगली स्मार्ट पाहिजे, एक नंबर देखणी असेल तर..., आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य
आमदार देवेंद्र भोयार
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भुयार यांनी एका जाहीर कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. “लग्नासाठी पोरगी पाहिजे असेल तर तो पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिजे असेल, एक नंबर देखणी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोट्ट्याला भेटत नाही. तर ती नोकरीवाल्याला भेटते. आणि दोन नंबरची पोरगी कुणाला भेटते? ज्याचा पान टपरी आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पान टपरी चालवतोय, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी, डोंबवी भेटते. आणि तीन नंबरचा जो गाळ राहिलेला, हेबडली, हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्ट्याला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलेलं नाही. जन्माला येणारं लेकरु आहे ते हेबाळ निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणराचे पिल्लू, असाच कार्यक्रम आहे सगळा”, असं वादग्रस्त वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केलं आहे.

देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे. “अजित पवारांनी आमदारांना नियंत्रणात ठेवावं”, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. “महिलांचा अपमान करणं चुकीचं आहे. अशा आमदारांना लाज वाटली पाहिजे. महिलांचं वर्गीकरण करणं चुकीचं आहे”, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीदेखील देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र भुयार काय म्हणाले ते माहिती नाही. पण वक्तव्याचा अर्थ चुकीचा निघत असेल तर भुयारांनी माफी मागायला हवी”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

यशोमती ठाकूर काय म्हणाल्या?

“मला आश्चर्य वाटते ज्या ठिकाणी अजित पवार यांचा लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होतो आणि त्याच ठिकाणच्या आमदारांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. ते महिलांबद्दल अपशब्द वापरतात. महिला ही जननी आहे. तुम्ही त्यांचं वर्गीकरण करू शकत नाहीत. ती संसार चालवत असते. महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करत आहात आणि दुसरीकडे महिलांचं वर्गीकरण करून महिलांचा अपमान करत आहात. त्यामुळे तुमची मानसिकता काय आहे ते समजत आहे”, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

“महिला उपभोगायचं साधन आहे का? अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोल मध्ये ठेवावं, अशा प्रकारचं महिलांचं वर्गीकरण कोणीही खपून घेणार नाही. तुम्हाला संसार आणि समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

“ज्या मतांसाठी महायुतीची एवढी चढाओढ सुरु आहे, एवढा गोंधळ ते घालत आहेत, त्या गोंधळात त्यांची मानसिकता काय आहे ते दिसून येत आहे. महिला ही काय उपभोगायचं साधन नाही. त्याचं तुम्ही कॅटेगराईज करु शकत नाही. या अशा आमदारांना असं बोलायला लाज वाटली पाहिजे. तुम्ही शिस्तीत राहा. अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं. त्यांची मानसिकता गुंड प्रवृत्तीची आहे हे दिसून येते”, असा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

“मला देवेंद्र भुयार काय म्हणाले ते माहिती नाही. तेही माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मी त्यांना विचारुन घेतो की, तुम्ही काय म्हणालात. जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व आमच्या माता-भगिनींची माफी मागायला हवी”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अंबादास दानवे यांचीदेखील टीका

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीदेखील देवेंद्र भुयार यांच्यावर टीका केली आहे. “महिलांबद्दल काय बोलावं, काय बोलू नये, याचं देखील भान देवेंद्र भुयार यांना राहिलेलं नाही. त्यामुळे अशा आमदारांवर कारवाई होणं गरजेचे आहे. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगायला हवं. शेतकऱ्यांची केलेली ही अवहेलना आहे”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.