नाशिकः कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे महापालिका आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहेत. शहरात 6 केंद्रावर नीडल फ्री लसीकरण करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 20 मशीनचे नियोजन केले असून, 50 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला लसीकरण वेगाने झाले. मात्र, अनेकांनी इंजक्शनची भीती वाटते म्हणून लस घ्यायला टाळाटाळ केली. राज्यभरही असे झाले. हे पाहता लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात नीडल फ्री लसीकरण केले जाणार आहे.
काय आहे नीडल फ्री लसीकरण?
नाशिक जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूटनिक या तीन लसी देण्यात येत आहेत. आता नीडल फ्री म्हणून ‘झायकोव-डी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. एका मशीनच्या मदतीने ही लस दिली जाते. त्वचेवर मशीन ठेवली जाईल. त्यानंतर टोचणी न करता लसीचे घटक शरीरात सोडले जातील. या लसीची परिणामकारकता 66.60 टक्के आहे. या लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार आहेत. त्या त्वचेच्या वरच्या थरात दिल्या जातील. पहिली मात्रा झाल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी आणि 56 दिवसांनी तिसरी मात्रा दिली जाणार आहे. केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केल्यांतर नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला प्रत्येक 8 लाख डोस दिले आहेत.
येथे 24 तास लसीकरण
नाशिकमध्ये वाढणारे कोरोनाचे रुग्ण आणि ओमिक्रॉनची विषाणूची भीती यामुळे शहरात 24 तास लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिकरोड येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात सोमवारपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे कोव्हॅक्सीन लस देण्यात येत आहे. सध्या नाशिकरोडला खोले मळा, वडनेर दुमाला, जेलरोड, सिन्नर फाटा, उपनगर, गंधर्वनगरी या परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत लसीकरण सुरू असते.
दुसऱ्या डोसकडे पाठ
नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहेत. त्यात 18 वर्षांवरील 13 लाख 63 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11 लाख 87 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेही नाहीत. ही चिंतेची गोष्ट असून, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शिवाय एक लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे प्रशासन लसीकरण जास्त करण्यावर भर देत आहे.
Pankaj Tripathi : मीही माणूसच वाईट तर वाटणारच, पंकज त्रिपाठींनी ऐकवली संघर्षाची कथा