महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळा ५.३० वाजता सुरु होणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर पोहोचून शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे आणि फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवा वाद सुरु झाला आहे. उदय सामंत यांनी राष्ट्रवादीने छापलेल्या निमंत्रण पत्रात शिंदे यांचे नाव नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीये.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत, परंतु त्यांची गृहखात्याची मागणी आहे. याशिवाय त्यांनी शिवसेनेसाठी 12 प्रमुख खाती मागितली आहेत. ती मिळाली नाहीत तर एकनाथ शिंदे यांचा मान कमी होईल, असा शिवसेनेचा दावा आहे. नुसतं उपमुख्यमंत्री असूनही ते मंत्रीच राहणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने छगन भुजबळ गृहमंत्री असताना मागील सरकारमधील मित्र पक्षाला गृहखाते दिल्याचे उदाहरण दिले आहे. राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेत शिंदे यांचे नाव नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी अद्याप शपथविधीबाबत निर्णय घेतला नसल्याचा दावा शिवसेना करत आहे.
शिवसेनेने राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवर आक्षेप घेतलाय. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर यानंतर लगेचच निमंत्रण पत्रिकेचा फोटो व्हायरल झाला. सरकार स्थापनेचा दावा करण्याआधी ही निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्याचे सांगण्यात आलंय. निमंत्रण पत्रिकेत फक्त फडणवीस यांचे नाव आहे. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव आहे. राष्ट्रवादीकडून हे निमंत्रण पत्र छापण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची फक्त नावे आहेत. पण एकनाथ शिंदे यांचे नाव नाही. शिंदे यांना कोणत्याही किंमतीत गृहमंत्रालय हवे आहे. निमंत्रणपत्र हे केवळ निमित्त असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.