नवी दिल्लीः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. म्हणून मी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावला. पण ठाकरे सरकारने आमच्याविरोधात राजद्रोहाचं कलम लावलं. हे इंग्रजांच्या काळातील कलम आहे. हे सरकार इंग्रजांच्या काळातील कायदे पाळतं हे महाराष्ट्राचंच दुर्दैव आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनीही मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आमच्याविरोधात हे कलम लावल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. दिल्लीत आज रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात तुरुंगात असताना आपल्याला वाईट वर्तणूक मिळाल्याची तक्रार करण्यासाठी रवी राणा आणि नवनीत राणा दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं राणा दाम्पत्याविरोधात जे राजद्रोहाचं कलम लावलं आहे, त्यावरच तात्पुरती स्थगिती आणली आहे. त्यानुसार केंद्र किंवा कोणतंही राज्य सरकार या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करू शकत नाही किंवा त्यानुसार कारवाई करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला इशारा देताना रवी राणा यांनी वरील वक्तव्य केलं.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, ‘ इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाचं कलम लावलं आहे. इंग्रजांनी हे कलम आणलं होतं. अनेक महापुरुषांवर हे कलम लावलं. तेच कलम आम्हाला लावलं. आपल्यावरील संकट आणि साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं होतं. उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली आहे. म्हणून हनुमान चालिसा वाचला. पण कोर्टाने आज कायद्याला स्थगिती दिली. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि किरेन रिजीजू यांचे आभार. इंग्रजांचे कायदे मोडून काढण्याचं काम मोदी करत आहे. ठाकरे सरकार इंग्रजांचे कायदे पाळतं हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. आम्ही कोर्टाचा आदर करतो. सरकारचे आभार मानतो, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं.
राजद्रोहाचं कलम लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पोलीस आयुक्तांना लालूच दिल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ संजय पांडेंनी मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी कलम लावलं. मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्त पांडेंना लालूच दिली. आश्वासन दिलं. त्यामुळेच त्यांनी आम्हाला आत टाकलं. आम्ही संसदेच्या माध्यमातून म्हणणं मांडणार आहोत. 23 तारखेला म्हणणं मांडणार आहोत, असंही रवी राणा यांनी स्पष्ट केलं.
नवनीत राणा यांच्या मुंबईती फ्लॅटविरोधात मुंबई महापालिकेने अनियमित बांधकाम प्रकरणी कारवाई सुरु केली आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंकाच आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला. ते म्हणाले, ‘ 2007 मध्ये इमारत बांधली गेली. त्यानंतर 7 ते 8 वर्षाने फ्लॅट घेतला. अनिल परब आणि संजय राऊत यांचे दहा बारा फ्लॅट आहे. माझा एकच आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा फ्लॅट आहे. आम्ही सर्व परवानग्या घेतल्या. महापालिकेने बिल्डरला सर्व परवानग्या दिल्या होत्या. 15 वर्षानंतर आम्हाला नोटीस आली. केवळ उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून नोटीस आली. खालच्या स्तरावर जाऊन घराला नोटीस दिली. महिला खासदारांना आमदाराला त्रास द्यायचं काम करत असेल तर पालिका ही शिवसेनेची भ्रष्टाचाराची लंका आहे. महापालिकेत आम्ही युद्धपातळीवर उतरू, असा इशारा रवी राणा यांनी दिला.