मुंबईंच्या महापौरांबद्दलचं ते वृत्त खोटं, पेडणेकरांची प्रकृती आता स्थिर, हॉस्पिटलचेही स्पष्टीकरण

| Updated on: Jul 18, 2021 | 8:57 PM

दरम्यान एका वृत्त वाहिनीकडून त्यांच्या निधनाची बातमी दिली गेली. त्यानंतर महापौरांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावरही गेलं. पण ही अफवा असल्याचं थोड्याच वेळात लक्षात आलं.

मुंबईंच्या महापौरांबद्दलचं ते वृत्त खोटं, पेडणेकरांची प्रकृती आता स्थिर, हॉस्पिटलचेही स्पष्टीकरण
Mayor Kishori Pednekar
Follow us on

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार सुरू आहेत. महापौरांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिलीय. तसंच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलनेही एक प्रेस नोट काढून, त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती दिली आहे. महापौर पेडणेकरांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांना तातडीनं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान एका वृत्त वाहिनीकडून त्यांच्या निधनाची बातमी दिली गेली. त्यानंतर महापौरांच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावरही गेलं. पण ही अफवा असल्याचं थोड्याच वेळात लक्षात आलं.

किशोरी पेडणेकर आता व्यवस्थित

काही प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमांवर मुंबईच्या माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रकृतीबाबत अनुचित वृत्त प्रसारित करण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ग्लोबल रुग्णालयामध्ये योग्य ते उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रकृती अस्‍वस्‍थ वाटू लागल्‍याने मा. महापौर या रुग्‍णालयात दाखल झाल्‍यात. सद्यस्थितीत महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर आहे. स्‍वतः मा. महापौरांनी त्‍यांच्‍या वैयक्‍ति‍क आणि महापौर कार्यालय ट्व‍िटर अकाऊंटवरुन संदेश देत अफवांचे खंडन केले आहे. त्‍यामुळे कृपया कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती. “कुठलेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्या वृत्ताची शहानिशा करून ते वृत्त प्रसारित करावे, अशी मी आशा करते”, असेही महापौर कार्यालयातून सांगण्यात आले.

नेमकी काय अफवा होती?

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक खालावली. छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे. परंतु सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा पसरवण्यात आलीय. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरत होता.

किशोरी पेडणेकरांकडून ट्विट करत अफवांना पूर्णविराम

अखेर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वतः जातीनं ट्विट करत या अफवांना पूर्णविराम दिलाय. किशोर पेडणेकरांनी ज्या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली, त्या वृत्तवाहिनीला ट्विट करत खडेबोल सुनावलेत. प्रिय… मी जिवंत आहे आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तसेच तुमच्या माहितीसाठी थोड्या वेळापूर्वीच दाल खिचडी खाल्ली आहे. मला खात्री आहे की, एक अग्रगण्य माध्यम गट म्हणून आपण सर्व मूलभूत पत्रकारिता तत्त्वांविषयी जागरूक आहात. कृपया करून अशा बातम्यांची शहानिशा करण्याचे कष्ट घ्यावेत. किमान एवढी तरी अपेक्षा करू शकतो, असं ट्विट करत किशोरी पेडणेकरांनी संबंधित वृत्तवाहिनीची चांगलीच कानउघाडणी केलीय.


रुग्णालयाचं नेमकं म्हणणं काय?

तर दुसरीकडे ग्लोबल रुग्णालयानंही यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलंय. माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांना आज दुपारच्या सुमारास छातीत दुखत असल्यानं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या आजाराचं निदान करून त्यांच्यावर उपचार सुरू केलेत. माननीय महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ग्लोबल हॉस्पिटल्स परळच्या वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली त्या उपचार घेत आहेत, असे ग्लोबल हॉस्पिटल्स मुंबईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जिग्ना श्रोत्रिया यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

news about the mayor of Mumbai kishori pednekar is false, Pednekar’s condition is now stable, the explanation of the global hospital