रत्नागिरी | 16 फेब्रुवारी 2024 : भाजप नेते निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात असणाऱ्या भावनिक नात्याविषयी माहिती दिली. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यादिवशी आपलं कुटुंब लंडनमध्ये होतं. पण बाळासाहेब यांचं निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आमचं अख्ख कुटुंब रडलं. वडील नारायण राणे जेवलेसुद्धा नाहीत, असं निलेश राणे म्हणाले. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची आठवण सांगितली. “नारायण राणे यांचं बाळासाहेबांवर अफाट प्रेम. बाळासाहेब बोलले म्हणजे विषय संपला. हे समजणारे आमचे नारायण राणे. अरे तू (भास्कर जाधव) काय ओळखतो नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील प्रेम. ज्यादिवशी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा आम्ही लंडनला होतो. आमचे वडील जेवले सुद्धा नाहीत. आमचं आख्खं घर रडलं. तू आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम सांगतो”, अशी टीका निलेश राणे यांनी केली.
“म्हणे, बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगितलं की नारायण राणेंना आम्ही काय नाही दिलं. यांनी दुसरेच शब्द वापरले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर इतके वाईट दिवस कधीच आले नव्हते की, तुला बाजूला बसवायला. कधी सांगितलं तुला? तुझा काय संबंध? आमच्या राणे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जेवढं प्रेम केलं ना, त्याच्या 25 टक्केही तू कधी प्रेम केलं नाहीस”, असं निलेश राणे म्हणाले.
“तुम्हाला एक घटना सांगतो. आम्ही विरोधी पक्षात होतो. राणे साहेब, विरोधी पक्षनेते होते. बाळासाहेबांनी आमच्या राणे साहेबांना सांगितलं की, नारायण हे काँग्रेस सरकार पडलं पाहिजे. राणेंनी शब्द दिला की, साहेब काहीही करणार पण यावेळी सरकार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. नारायण राणेकडे पैसा नव्हता. फक्त फौज होती. ते 25 ते 30 आमदारांना घेऊन आमदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतील मातोश्री क्लबला ठेवलं”, असं निलेश राणे म्हणाले.
“विरोधी पक्षनेता असताना नारायण राणेंनी स्वत:चं घर गहाण ठेवलं की, मी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिलाय. अरे आमची आई विचारायला लागली की, अहो आपण राहणार कुठे? माझ्या आईला सांगितलं की, नाही मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे. मी आता माघार घेऊ शकत नाही. ते सरकार आपलं राहीलं नाही. एका मताने पडलं. आमची काय अवस्था झाली असेल? पण नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले नाहीत की, साहेब माझं सगळं संपलं. माझे कोट्यवधी रुपये गेले. मला काहीतरी मदत करा. अशी मदत मागायला नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले नाहीत. त्यांनी परत स्वत:ला सिद्ध केलं. पुन्हा तशी परिस्थिती उभी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात परत स्वत:ला सिद्ध करणारा एकच नेता आहे तो म्हणजे नारायण राणे. हे शरद पवार वैगेरे यांना आयतं मिळालं. पश्चिम महाराष्ट्रात सर्व काही होतं. आमच्या नारायण राणे यांनी एक-दोन रुपयापासून नोकरीला सुरुवात केली”, असं निलेश राणे म्हणाले.
“भास्कर जाधव शिवसेनेतून दोन वेळा निवडून आले. 1994 आणि 1999 ला निवडून आला. पण 2004 ला याचं तिकीट कापलं. हा मातोश्रीच्या बाहेर रडत होता. गाडीत बसला आणि चिपळूणला आला. अपक्ष फॉर्मला भरला. पराभव झाला. पण पूर्ण निवडणूक याने उद्धव ठाकरेंना शिव्या घातल्या. तू उद्धव ठाकरे यांच्यावरचं प्रेम सांगतो. तुझा उद्धव ठाकरेंशी काय संबंध? तू उद्धव ठाकरेंसाठी काय केलं?”, असे सवाल निलेश राणेंनी केले.