मुंबई : राज्यात सध्या पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे सर्घष पेटला आहे. कारण भाजप नेते निलेश राणे यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. निलेश राणे यांनी दिवंगत नेते मनोहर परीकर यांचा एक फोटो ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
निलेश राणे राणेंच्या ट्विटमध्ये काय?
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण 1 दिवससुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणास्तव पूर्णवेळ अधिवेशनाला उपस्थित नाहीत. त्यावरून भाजप नेते मुख्यमंत्र्यांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत आहेत.
नितेश राणे विरुद्ध आदित्य ठाकरे
गुरूवारी अधिवेशावेळी विधानसभेबाहेर आंदोलन करत असताना आदित्य ठाकरे तिथे येताच नितेश राणे यांनी म्याऊ, म्याऊच्या घोषणा द्यायला सुरूवात केली, शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाल्याची टीकाही त्यांनी केली, त्यानतंर त्यावरून बराच वाद पेटल्याचे दिसून आले. यावेळी नितेश राणे यांनी मी आणखी आक्रमकतेने सरकारवर तुटून पडणार असल्याचेही सांगितले आणि त्यांच्या या ट्विटमधूनही तेच दिसून येत आहे. विविध मुद्द्यांवरून भाजप सध्या महाविकास आघाडी सरकारला घेरण्याच प्रयत्न करत आहे. अधिवेशनातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरे यांना द्यावा, अशीही टीका केल्याने वाद पेटला होता. आता निलेश राणे यांच्या या ट्विटनंतरही पुन्हा हा वाद वाढण्याची शक्यता आहे. राणे विरुद्ध ठाकरे हा वाद महाराष्ट्राला जरी नवा नसला तरी आता तो संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यामुळे अधिवेशनाचे उरलेले दिवसही वादळी ठरण्याची जास्त शक्यता आहे.